फुणगूस प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या अनागोंदी आणि ढिसाळ कारभाराविरोधात डिंगणीचे उपसरपंच तथा भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी थेट उपोषणाचे हत्यार उपसले. भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य राकेश जाधव त्यांच्या मदतीला धावले आणि आरोग्ययंत्रणेची धावपळ उडाली. अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी धाव घेऊन सर्व मागण्या मान्य करून लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. सात दिवसांत कार्यवाही झाली नाही तर पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशारा मिथुन निकम यांनी दिला. फुणगूस येथील प्राथमिक आरोग्यकेंद्र हे खाडी भागातील सुमारे १८ गावांसाठी सेवा देणारे शासकीय आरोग्यकेंद्र आहे. तसेच ४ उपकेंद्रदेखील आहेत; परंतु उपकेंद्र किती सुरू आणि किती बंद, याकडे आरोग्य विभागाचेच लक्ष नाही. फुणगूस प्राथमिक आरोग्यकेंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे. दोन डॉक्टर असूनही एकही डॉक्टर रात्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसतो. या सर्व तक्रारींची दखल डिंगणीचे उपसरपंच निकम यांनी घेतली आणि उपोषणाला बसले. त्यामुळे आरोग्य विभागाची धावपळ उडाली.
अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे यांनी उपोषणस्थळी धाव घेतली आणि चर्चेला सुरुवात झाली. राकेश जाधव यांनी आरोग्य यंत्रणेला धारेवर घेतले. दोन डॉक्टर असून, मुख्यालयात एकही डॉक्टर का नाही? लसीकरणाचा अहवाल द्या, उपकेंद्र किती सुरू आहेत आणि तिथे कोण कर्मचारी राहतात? याचा अहवाल द्या. फिरती मोहीम, गरोदर महिला संगोपन, सुविधा, क्षयरुग्ण मोहीम, कुपोषण मोहीम, शासनाच्या किती मोहिमा येथे राबवल्या जातात, त्याची माहिती मिथुन निकम व राकेश जाधव यांनी मागितल्यानंतर आरोग्य प्रशासन जणू हतबल झाले. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी थेट सर्व मागण्या मान्य करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली; परंतु फक्त आश्वासन नको, लेखी पत्र द्या आणि ते आताच हवे, अशी मागणी मिथुन निकम यांनी केली.
सखोल चौकशीचे अधिकाऱ्यांचे आश्वासन – जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये यांनी कामचुकार व लसीकरण मोहिमेत अनागोंदी कारभाराबाबत सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तक्रारी आहेत त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल आणि विशेष म्हणजे कर्मचारी व डॉक्टर मुख्यालयातच थांबतील, असे लेखी आश्वासन उपोषणकर्ते मिथुन निकम, भाजप पदाधिकारी व ग्रामस्थांना दिले.