हॉटेलच्या बांधकामासाठी आवश्यक असणारा आरोग्य विभागाचा नाहरकत दाखला देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना येथून जवळ असलेल्या कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक शैलेश आत्माराम रेवाळे (वय ३८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. मंगळवारी ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे उपअधिक्षक सुशांत चव्हाण यांनी पत्रकारांना दिली. आरोपीकडून लाच म्हणून स्विकारलेली रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ३१) रोजी करण्यात आली.
अधिक वृत्त असे की, तक्रारदारांच्या मालकीच्या हॉटेल बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील नाहरकत दाखला मिळविण्याकरिता तयार केलेला अर्ज स्वीकारण्यासाठी व या कामासाठीची प्रक्रिया पूर्ण करून नाहरकत दाखला देण्यासाठी शैलेश रेवाळे याने २६ ऑक्टोबर २०२३ रोजी पंधरा हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाकडून मंगळवारी सापळा रचण्यात आला. या जाळ्यात आरोग्य सहायक शैलेश रेवाळे अलगद अडकला. पंचासमोर १५ हजार रूपयांची लाच घेताना रेवाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आले असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी या बिभागाचे पोलिस निरिक्षक शहानवाज मुल्ला तपासी अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल परडीवार, सुधाकर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक सुशांत चव्हाण यांच्या पर्यवेक्षणाखालील पथकाने ही कामगिरी केली. या पथकात पोलीस निरीक्षक शहानवाण मुल्ला, पोलिस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, नाईक दिपक आंबेकर, कॉन्स्टेबल हेमंत पवार यांचा समावेश आहे.