राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला असून चीनमध्ये अनेक शहरांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. यासंदर्भात बोलत असतांना राजेश टोपे म्हणाले की, जगभरात कोरोनाची चौथी लाट आली असून त्यातून आपण शिकवण घेण्याची गरज आहे. लोकांनी निष्काळजीपणे न वागता सतर्क राहाणे गरजेचे आहे. तसेच सवलत मिळाली म्हणून बेफिकीरपणे वागणे पूर्णत: चुकीचे आहे.
आपण वेट अँड वॉचची भूमिका घेतली पाहिजे, कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी निर्बंधांचे पालन करावे, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असून असे असले तरी मास्क, सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे सक्तीचे असणार आहे. भारतात कोरोनाची संक्रमित रुग्णसंख्या जरी आटोक्यात आली असली तरी, अजून कोरोना संपलेला नाही.
परदेशात कोरोनाच्या चौथ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेला जशी भारतामध्ये अवस्था होती तशीच काहीशी अवस्था सध्या परदेशातील काही राष्ट्रांमध्ये आहे. त्यामुळे कोरोना काळामध्ये योग्य ती काळजी घेऊनच आपण जसे वावरत होतो तेवढी स्वत:साठी काळजी घेणे गरजेचे आहे. आणि कोरोनाच्या संसर्गाचा वेग आपण अनुभवला आहे त्यामुळे बेफिकीर न राहता, वेळीच योग्य काळजी घेत राहणे चांगले.