राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना नियमित शासनसेवेत समायोजन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला सव्वा वर्ष झाले तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे त्याच्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. पुरेशा वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांअभावी कोलमडलेल्या आरोग्ययंत्रणेला सलाईनसारखी मदत होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाला विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या शासकीय बूस्टरची प्रतीक्षा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये राज्यभरातील ३८ हजार कर्मचाऱ्यांसोबत जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. गणेशोत्सवामध्ये कोणत्याही साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रयत्नशील असलेल्या आरोग्ययंत्रणेवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाने ताण वाढला आहे.
आरोग्य विभागाला सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचे व्यवस्थापन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नियमित शासनसेवेत समायोजनाबाबत होत असलेल्या विलंबासाठी शासननिर्णयानुसार, दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना १४ मार्च २०२४च्या शासननिर्णयानुसार शासनसेवेत समायोजन करण्याबाबत शासननिर्णय झाला आहे; परंतु त्यालाही सव्वा वषपिक्षा जास्त कालावधी उलटला तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना आरोग्यसेवेतील मान्यताप्राप्त समकक्ष पदावर म्हणून घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते; मात्र, त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती व एकता संघ महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
जिल्ह्यातील सातशे कर्मचारी सहभागी – बेमुदत संपामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले सुमारे सातशेहून अधिक तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यिका, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी यांचा समावेश आहे.