रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागील ३ दिवसापासून सुरु झालेल्या पावसाने अनेक तालुक्याना चांगलेच झोडपून काढले आहे. मागील २४ तासामध्ये सरासरी १३०.२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासामध्ये पडलेल्या पावसाची तालुकावार संख्या पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड २१५.१० मिमी, दापोली ९४.३० मिमी, खेड ४६.५०, गुहागर १३५.६० मिमी, चिपळूण १०२.५० मिमी, संगमेश्वर १४५.०० मिमी, रत्नागिरी १६२.९०मिमी, राजापूर १२८.७० मिमी, लांजा १४१.७० मिमी.पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शनिवार रात्रीपासून सुरु झालेल्या धुवांदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. संगमेश्वरमधील गड नदी आणि राजापूरमधील कोदवली नदीने पाण्याची पातळी ओलांडल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने आणि गडनदीला आलेल्या पुरामुळे माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. खाडीला असेलेली भरती आणि पावसाची संततधार त्यामुळे गडनदीच्या पाणी पातळी मर्यादेमध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे माखजन बाजरपेठेत पुराचे पाणी शिरले. कोंडीवरे नायशी रस्ता पूर्ण पाण्याखाली गेल्याने आसपासच्या गावचा संपर्क तुटला आहे.
संगमेश्वर परिसरातील शास्त्री, असावी, गड, अलकनंदा, सोनवी नद्यांची पात्रे दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या ओव्हरफ्लो झाल्याने बाजारपेठांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे व्यापारी वर्ग व काठावरील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. काही गावांचा संगमेश्वर बाजारपेठेशी देखील संपर्क तुटला होता. दुपारनंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने, पाण्याची धोक्याची पातळी कमी झाल्याने व्यापारी वर्गाला जरासा दिलासा मिळाला. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने आणि गारठ्याने जनता हैराण झाली आहे.