कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी अक्षरशः कहर माजवला आहे. त्याचा सर्वाधिक फटका रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर परिसरातील मासेमारी व्यवसायाला बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे समुद्र खवळला असून, जोरदार वाऱ्यांमुळे लाटांची उंची वाढली आहे. या प्रतिकूल हवामानामुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावरच उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे स्थानिक मासेमारांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. हवामान विभागाने रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारट्टीसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील २४ ते ४८ तास मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना धोका असल्याने मत्स्य व्यवसाय विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने समुद्रात न जाण्याच्या काटेकोर सूचना दिल्या आहेत. हर्णे बंदरात बोटी बंदरात उभ्या असल्याने मासेमारांकडे पर्याय उरलेला नाही.
अनेक मासेम ारांनी समुद्र खवळण्यापूर्वीच मासेमारी करून परतलेल्या बोटींमधील मासळी विक्री केली असली, तरी मागील दोन दिवसांपासून मासळीचा पुरवठा लक्षणीय घटला आहे. परिणामी मासळीच्या बाजारभावात वाढ झाली आहे. हणें, दापोली, केळशी परिसरातील मासळी मार्केटमध्ये सध्या ताज्या मासळीची टंचाई जाणवत आहे. किनाऱ्यालगतच्या अनेक गावांमध्ये दरम्यान, मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, वीजपुरवठा खंडित होणें अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाकडून बचाव पथके सतर्क ठेवण्यात आली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मासेम ारांना देखील आदेशांचे पालन करण्यास सांगण्यात आले असून, वादळ शांत होईपर्यंत समुद्रात न जाण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.
हर्णे बंदर हे कोकणातील प्रमुख मत्स्य व्यवसाय केंद्र असल्याने येथे दररोज शेकडो बोटी मासेमारीसाठी निघतात. मात्र सध्या वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे मासेमारांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवस मासेमारी बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या सर्व घडामोडींमुळे कोकण किनारपट्टीवर असलेला मासेमारी व्यवसाय मोठ्या संकटात सापडला असून, मासेमारांचे उत्पन्न आणि नागरिकांच्या जेवणावळीतील ताज्या मासळीचा पुरवठा दोन्ही ठप्प होण्याची भीती निम णि झाली आहे. प्रशासनाकडून पुढील हवामान परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

