मुंबईमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यात आता पुढील चार ते पाच तासांत देखील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत जोरदार पावसाची वर्तवण्यात आली आहे. कालपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचून मुंबईकरांना फटका बसला. गेल्या महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पूर्व संध्येपासून दमदार हजेरी लावत मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडविली आहे.
जून महिन्यात पाऊसच न पडल्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील जलसाठा कमालीचा खालावला होता. परिणामी, मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठ्यामध्ये १० टक्के पाणी कपात लागू करावी लागली. जुलैच्या पूर्वसंध्येपासून मुंबईत पावसाने जोर धरला असून काही भागात अतिमुसळधार पाऊस कोसळला. परिणामी, सखलभाग जलमय होऊन सर्वांचीच तारांबळ उडाली. तर साचणाऱ्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती.
मुंबई आणि उपनगरांमध्ये ३० जून रोजी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. तर, आज देखील मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत कुलाब्यामध्ये २२७ मिमी, तर सांताक्रुझमध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
मुंबईप्रमाणेच राज्यातही पावसाने दडी मारली होती. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हांमध्ये तुलनेत पाऊस कमी होता. परंतु मुंबईत पावसाचा मागमूसही नव्हता. परिणामी, जूनअखेरपर्यंत मुंबई शहरात ४४ टक्के, तर उपनगरांमध्ये ५१ टक्के पावसाची तूट नोंदली गेली. मात्र आता दमदार हजेरीमुळे ही तूट भरून निघेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई येथे पावसाचे मध्यम ते तीव्र ढग जमा झाले आहेत. त्यामुळे पुढील चार ते पाच तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन हवामान अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.