रत्नागिरी मध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड आणि नुकसान घडून आले आहे. अशा पाऊस आणि वाऱ्याच्या माऱ्यामुळे ग्रामीण भागांमध्ये घराभोवती असणारी जुनी मोठी झाडे घरांवर पडून नुकसान होण्याच्या घटना पावसाळ्यामध्ये घडत असतात. अशीच एक घटना शीळमध्ये घडली आहे.
तालुक्यातील शीळ येथील विश्वास बिर्जे यांच्या घरावर रविवारी रात्री एकच्या सुमारास मागील पडवीवर आंब्याचे झाड कोसळले. रात्रीचे जेवण उरकून, विश्वास बिर्जे, पत्नी आणि दोन मुले घराच्या ज्या ठिकाणी झाड पडले त्या खोलीमध्ये झोपलेली होती. अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले पती-पत्नी यांनी त्वरित उठून त्यांनी खोलीतील लाईट सुरू केला असता, खोलीमधील पत्र्यावर आंब्याचे झाड पडले असून, तुटलले पत्रे दिसले. विश्वास आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. स्वतः जखमी असून, त्या स्थितीमध्ये लहान मुलांना उचलून खोली बाहेर आले. सुदैवाने घरातील लहान मुलांना कोणतीही इजा झाली नाही.
शीळचे उपसरपंच अशोक पेडणेकर आणि सहकाऱ्यांना ही माहिती समजल्यानंतर सकाळी पडवीच्या छप्परावर पडलेले आंब्याचे झाड बाजूला करून पडवी मोकळी करण्याचे काम सुरू केले. किरकोळ जखमी असलेल्या विश्वास बिर्जे आणि त्यांच्या पत्नीला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याचे उपसरपंचानी सांगितले.
दरम्यान, त्यांनी तत्काळ त्यांची प्रकृती चांगली असल्याचे उपसरपंच पेडणेकर यांनी सांगितले. तलाठी कोकरे, सरपंच नामदेव गोंडाळ आदींनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी आणि पंचनामा केला. तसेच बिर्जे कुटुंबीयांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था बाजूच्या घरामध्ये केल्याची माहिती उपसरपंच पेडणेकर यांनी दिली.