शहरातील खंड भागात शुभम अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला असणारी दरड आज अती पावसामुळे कोसळल्याने दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. पैकी एक घर दरडीच्या काठावरच आहे तर दरडीच्या खालच्या भागालाही धोका निर्माण झाला आहे. शहरात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार आवाज करीत दरड शुभम अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला कोसळली. सुदैवाने या ठिकाणी खालच्या भागाला आरसीसी संरक्षणभिंत असल्याने दरड त्या ठिकाणी येऊन विसावली नाहीतर ही दरड खाली असणाऱ्या मोहिरे याच्या बिल्डिंगवर येऊन आदळली असती मात्र दरड त्याच ठिकाणी थांबली. दरडीच्या वरच्या भागावर गणेश शिंदे आणि बबन राणीम याचे घर आहे त्या खाली नुकतीच संरक्षणभिंत बांधण्यात खाली होती होती मात्र हीच भिंत कोसळली असल्याने शिंदे आणि राणीम याच्या घराला धोका निर्माण झाला आहे. या दोन घरांपैकी एक घर तर अगदीच काठावर आहे.
ते कधीही कोसळू शकते अशी अवस्था आहे. तसे घडले तर इतर घरे ही धोक्यात येण्याची शक्यता आहे. या मुळे खाली असणाऱ्या घरानाही धोका निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी राहणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते विलास चिपळूणकर यांनी घटनेची माहिती तात्काळ चिपळूण नगरपालिकेला दिली आणि नगरपालिका प्राशसन या ठिकाणी दाखल झाले. मुख्याधिकाऱ्यांनीही या घटनास्थळी भेट दिली असून उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. धोकादायक असणाऱ्या दोन घरांतील लोकांना इतरत्र हलवण्याची गरज निर्माण झाली असून प्रशासन पर्यायी व्यवस्था काय करते हे महत्वाचे ठरणार आहे.