संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पंचक्रोशीला मुसळधार पावसाने बुधवारपासून (ता. २) झोडपून काढले. त्यामुळे साखरपा परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. नव्यानेच लावणी लावलेल्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून, भातपिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक सखल ठिकाणी पाणी साचले असून, चौपदरीकरणामुळे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेला पाऊस अखंड रात्रभर पडून गुरुवारी सकाळीही कायम आहे. यामुळे सर्वत्र पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. हे पाणी आता भातशेतातून शिरले आहे. शेतकऱ्यांनी नुकताच भातलावणीला प्रारंभ केला आहे. परिणामी, अजून लावणी लावलेली रोपे ही कोवळी आहेत.
आता पावसाचे पाणी भातशेतीत शिरल्याने ही कोवळी रोपे पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर असाच यापुढेही कायम राहिला तर ही पिके वाहून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. साखरपा गावालगत वाहणाऱ्या काजळी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. चार वर्षांपूर्वी साखरपा गावपरिसरातील काजळी नदीपात्राचा गाळ उपसा केल्याने तिची खोली वाढली आणि पात्रही गाळमुक्त झाले. त्यामुळे साखरपा गावाला असलेला पुराचा धोका टळला असला तरी सध्या पडत असलेल्या पावसाने या नदीवर असलेल्या पुर्ये गावात जाणारा सीमेचा पूल मात्र गेले दोन दिवस पाण्याखाली गेला आहे. पुलावरून सुमारे तीन फूट पाणी वाहत आहे.
साखरपा बसस्थानकातही पाणी… – साखरपा बसस्थानकाला पावसामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वच्छतागृहाच्या परिसरात पाणी साचल्यामुळे प्रवाशांची पंचाईत होत आहे. हे स्वच्छतागृह कसे वापरायचे, हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. गेले दोन दिवस पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साखरपा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हे पाणी नेमके स्थानकातील स्वच्छतागृहाच्या परिसरातच साचले आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान स्वच्छतागृहाकडे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी पंचाईत होत आहे. त्याचप्रमाणे स्थानकाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू होते. त्या कामासाठीचा वाळूचा ढीगही त्याच पाण्यात पडून आहे. स्वच्छतागृहासमोरच या कामाच्या वाळूचा ढीग टाकल्यामुळे प्रवाशांना स्वच्छतागृहाकडे जाणे अशक्य होऊन बसले आहे. विशेषतः महिला प्रवाशांना यामुळे मोठी अडचण होत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराकडे परिवहन कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून प्रवाशांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.