24.4 C
Ratnagiri
Sunday, August 17, 2025

पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य सर्वच बाबतीत जिल्हा अग्रेसर – पालकमंत्री डॉ. सामंत

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाने भारतीय लष्कराचे सामर्थ्य...

मोदींचे दिवाळी गिफ्ट! मध्यमवर्गीयांना मिळणार मोठा दिलासा

सणासुदीचे दिवस सुरू झाले असताना देशाचे पंतप्रधान...

रत्नागिरीतील एका बँकेत? नोटीस येताच खळबळ

रत्नागिरी जिल्ह्यातील एका बड्या बँकेच्या ९३ कर्जदार...
HomeRatnagiriजिल्ह्यात पावसाचे थैमान, महामार्गावरील दुकानांमध्ये पाणी

जिल्ह्यात पावसाचे थैमान, महामार्गावरील दुकानांमध्ये पाणी

मागील २४ तासांत सरासरी ३२.९५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे नद्या-नाले दुथडी वाहत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे रस्त्याच्या बाजूची गटारे उद्ध्वस्त झाली आहेत. महामार्गावर हातखंबा येथे पावसाचे तुंबलेले पाणी दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे समुद्राला उधाण आले असून, मच्छीमारीवर परिणाम झाला आहे. पावसाचा जोर दोन दिवस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत सरासरी ३२.९५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असले तरीही बळीराजा मात्र सुखावला आहे. लावणीची कामे आटोपल्यानंतर समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने भातावर करपा रोग पडण्याची भीती होती; मात्र आता पडलेल्या पावसामुळे भाताची बाढ झपाट्याने होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे आणि मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे गटारे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी तुंबली आहेत. त्यामुळे संगमेश्वरपासून अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी आहे. हातखंबा येथे तर गटार तुंबल्याने रस्त्यावरील पाणी थेट दुकानांमध्ये शिरले. अनेक दुकानमालकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला. सामानाचे मोठे नुकसान झाले असून, मालकांवर बादलीने दुकानातील पाणी काढण्याची वेळ आली. दोन आठवड्यांपूर्वीच मासेमारीला सुरुवात झाली होती; मात्र हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा निर्णय घेतला. खोल समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने मासेमारी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेकडो नौका मिरकरवाडा, हर्णै, जयगड, काळबादेवी बंदरात आश्रयाला आल्या आहेत. सध्या श्रावण महिना सुरू असल्याने तसेही मत्स्यप्रेमींची संख्या कमी आहे.

तरीही अनेक जण मासे खरेदीसाठी येत आहेत; पण त्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. दुसरीकडे, किनारपट्टीजवळ मासेमारी करणाऱ्या नौकांकडून उपलब्ध होणाऱ्या माशांना सोन्याचा भाव आला आहे. मिऱ्या आणि पंधरामाड या परिसरांमध्ये समुद्राच्या लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. जोरदार लाटा किनाऱ्यावर आदळत असल्याने किनारपट्टीवरील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.

दोन शाळकरी मुले बचावली – मुसळधार पावसामुळे शहरातील मारुती मंदिर येथील भाजी मार्केट परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला होता. वाहनचालकांना पाण्यातून कसरत करावी लागत होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन शाळकरी मुले थेट गटारात पडली. सुदैवाने मुलांनी स्वतःला सावरल्यामुळे जीव वाचला. रस्त्यावर साचलेले पाणी मारुती मंदिर, कर्लेकर वाडी, भाजी मार्केट आणि कोहिनूर सोसायटीत शिरले होते. त्यामुळे येथील दुकानांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular