मुंबई- गोवा महामार्गावरील निवळी घाटात गॅस टँकरचा ब्रेक निकामी झाल्याने टँकर रस्त्यात उलटला. त्यामुळे पाच तास महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होती. सुदैवाने, या अपघातात गॅस गळती झालेली नाही. अपघातग्रस्त टँकर रस्त्यातच आडवा झाल्यामुळे मोठी वाहतूककोंडी झाली. गॅस तज्ज्ञांच्या टीमला बोलावण्यात आले होते. मात्र सायंकाळपर्यंत टीम आली नव्हती. सायंकाळी दुचाकी, चारचाकी गाड्या एका बाजूने सोडल्या जात होत्या. हातखंबा वाहतूक मदत केंद्र, ग्रामीण पोलिस कर्मचारी, अधिकारी सुरक्षेच्यादृष्टीने घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी २.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.
तालुक्यातील जयगड येथून हा टँकर गॅस भरून नाशिकला निघाला होता; परंतु निवळी घाटात अचानक टँकरचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला. टँकर रस्त्यात उलटून हा अपघात झाला. अपघातामध्ये केबिन बाजूच्या दरडीवर आदळली तर गॅसटाकी मुख्य रस्त्यावर आडवी झाली. त्यामुळे महामार्ग बंद झाला. सुरक्षेच्यादृष्टीने तत्काळ हातखंबा वाहतूक मदतकेंद्राचे पोलिस आणि ग्रामीण पोलिसांनी लांब वाहने थांबवून गॅस गळती झाली आहे की नाही, याची खात्री केली. सुदैवाने, गॅस गळती झाली नाही. याबाबत तत्काळ गॅस कंपनीला कळवण्यात आले.
दरम्यान, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. अखेर पोलिसांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी जागा केली; परंतु अवजड वाहने जाण्यासारखी जागा नसल्याने अवजड वाहनांची महामार्गावर पाच तास कोंडी झाली होती. उशिरापर्यंत गॅस तज्ज्ञांची टीम आली नव्हती. रत्नागिरी येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, दाभोळ घाटातही टँकरचा अपघात झाला. हातखंबा वाहतूक मदत केंद्राची दुसरी टीम तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. एकमेकांवर गाड्या आदळून हा अपघात झाला होता.