गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी झाली असून, प्रवाशांना तासन्तास ताटकळत राहावे लागत आहे. अवजड वाहने बंदी मोडून धावत असल्याने कोंडी वाढली आहे. याचा सर्वाधिक त्रास महामार्गावर संगमेश्वर येथील सोनवी पुलाजवळ जाणवत आहे. बुधवारी सकाळपासूनच संगमेश्वर ते नवनिर्माण महाविद्यालयदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. शासनाने गणेशोत्सवासाठी अवजड वाहनांना बंदी घातलेली आहे; मात्र चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात अवजड वाहनांची अडचण होत आहे. सोनवीच्या पुलावर एका मोठ्या ट्रेलरमुळे वाहतूककोंडी झालेली होती. याबाबत प्रवाशांनी चिंता व्यक्त केली असून, अवजड वाहनांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
गेल्या वर्षीही अशाच प्रकारे वाहतूककोंडी झालेली होती. त्यात यंदाही सुधारणा झालेली नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहनांना बंदी घातलेली असतानाही, या आदेशाला धाब्यावर बसवून अनेक अवजड वाहने महामार्गावरून धावत आहेत. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून गंभीर वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. परतीच्या प्रवासात अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे मग वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने बंदी कशाला, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
पर्यायी मार्गांचे फसले नियोजन – सोनवी पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असून, पर्यायी मार्गांच्या अपुऱ्या नियोजनामुळे आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे संगमेश्वर-देवरूख मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाने तत्काळ उपाययोजना करून मार्ग मोकळा करण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पोलिसही हैराण – संगमेश्वर सोनवी चौक येथे संगमेश्वर पोलिस, तसेच वाहतूक पोलिस तैनात होते; मात्र सोनवी पूल ते गणेशकृपा हार्डवेअरपर्यंत एकेरी मार्ग असल्यामुळे पोलिसांनादेखील वाहतूक सुरळीत करताना मनस्ताप सहन करावा लागला. बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून संगमेश्वर-देवरूख मार्गावर मुंबईकडे परतणारी अनेक वाहने आल्यामुळे संगमेश्वर सोनवी चौक येथील वाहतूक कोंडीचा फटका या वाहनांना बसला आहे.