मुंबईत हेल्मेट सक्ती होतीच, मात्र दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या म्हणजेच पिलियन रायडरलाही हेल्मेटसक्ती केली जाणार असं मुंबई पोलिसांनी सांगितलं होतं. त्यानुसार मुंबईकरांना हेल्मेट खरेदी करण्यासाठी १५ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. आता मात्र ही मुदत संपली आणि १० जून पासून मुंबई वाहतूक पोलिसांनी थेट कारवाई करायला सुरुवात केली आहे.
मुंबईत १० जून रोजी मुंबई वाहतूक पोलिसांनी एका दिवसात तब्बल ६ हजार २७१ मुंबईकरांवर हा कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये दुचाकीस्वाराने हेल्मेट न घातलेलं आढळलेले २ हजार ३३४ बहाद्दर आढळले आहेत, तर सर्वात जास्त प्रमाणात दंड वसूल केला गेला, त्यामध्ये दुचाकीस्वाराच्या मागे बसेलेले लोकं आहेत. यांना पिलियन रायडर असं म्हणतात. याच दुचाकीस्वाराच्या मागच्या सीटवर बसलेल्या मात्र हेल्मेट न घातलेल्या ३ हजार ४२१ व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आली. मुंबई वाहतूक पोलिसांनी एक ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी याआधी दुचाकीस्वाराला हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं होतं. आता मात्र दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आले आहे. हे पाऊल मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी उचललं असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.
मुंबईचे वाहतूक पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी मुंबई पोलिसांना थेट कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यासाठी मुंबईत पन्नास वाहतूक चौक्या जागरूक राहतील. ज्यांच्याकडे हेल्मेट नसेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यांचा परवाना ३ महिने रद्द केला जाईल. त्यांना ५०० रुपये दंडही भरावा लागेल असे आदेश राजतिलक रोशन यांनी दिले होतं.
बाईकर्स लक्ष द्या! दुचाकीस्वार आणि हेल्मेट अन पिलियन रायडर्सना मोटार वाहन कायद्यांतर्गत गंभीर दंडाला सामोरे जावे लागेल. तुमच्या सुरक्षिततेसाठी, तुम्ही नियमांचे पालन करत असल्याची खात्री करा अशी पोस्ट पोलिसांनी ट्विटरवर टाकत मुंबईकर दुचाकीस्वारांना नियम पाळा अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जा असा सज्जड इशाराच दिला आहे. मुंबईकर मात्र या निर्णयाचा विरोध करताना पाहायला मिळत आहेत.