25.9 C
Ratnagiri
Monday, July 15, 2024

मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनविण्याचं माझं स्वप्नः नरेंद्र मोदी

लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी...

संगमेश्वरात एसटीतून चक्क छत्र्या उघडून करावा लागला प्रवास

शनिवारी संगमेश्वर ते कोंडये सोडण्यात आलेल्या एस....

मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची बरसात…

मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार...
HomeChiplunअंश'च्या मदतीसाठी अनेकांची मदत - शस्त्रक्रिया यशस्वी

अंश’च्या मदतीसाठी अनेकांची मदत – शस्त्रक्रिया यशस्वी

तालुक्यातील कळमुंडी येथील बैलगाडा स्पर्धेदरम्यान झालेल्या अपघातात कोंढे माळवाडी येथील अंश सुरेंद्र किलजे या सहा वर्षीय बालकाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला अधिक उपचारासाठी कराड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने शस्त्रक्रीयेचा खर्च कसा करायचा, या विवंचनेत किलजे कुटुंब होते. याचवेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांच्यासह असंख्य स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यांच्या आर्थिक सहयोगातून अंश याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून तो सोमवारी सुखरूप घरी परतला आहे.

काही दिवसांपूर्वी कळमुंडी येथे बैलगाडा स्पर्धा पार पडल्या. स्पर्धा पाहण्यासाठी कोंढे माळवाडी येथील सुरेंद्र किलजे हे आपला मुलगा अंश याला घेऊन गेले होते. या स्पर्धेनंतर उधळलेल्या बैलांची धडक बसून अंश याच्या कानाला, चेहऱ्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्याला अधिक उपचारासाठी तात्काळ कराड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. मात्र त्यासाठी अंदाजे पाच लाख रुपयांचा खर्च होता. किलजे कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्याने गावातील युवा कार्यकर्ते तुषार करंजकर, भाई करंजकर यांनी स्थानिक पातळीवरून दानशूर लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले.

अपघाताची माहिती आमदार शेखर निकम यांनाही देण्यात आली. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखाची मदत प्राप्त करून घेतली. यासाठी गणेश साबळे, किशोर कदम, रूपेश इंगवले, सिद्धेश लाड यांचेही सहकार्य लाभले. रामपूरचे राजेश जाधव, संकल्प अवेरे, विक्रांत चव्हाण यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याही कानावर ही गोष्ट घालत अंशसाठी आर्थिक मदतीची मागणी केली. पालकमंत्री उदय सामंत यांनीही तातडीने अंशच्या उपचारासाठी एक लाखाची मदत जाहीर केली. ती मदतही त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न केले. स्थानिक ग्रामस्थांनी आपापल्या परीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला. किलजे कुटुंबाने या सर्व दानशूर लोकांचे आभार मानले आहेत. सहा महिन्यानंतर अंश याच्यावर अजून दोन शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular