चिपळूण येथील ऍड. ओवेस पेचकर यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील साधारण २.५ ते ३ वर्ष कासवाच्या गतीने संथरित्या सुरू आहे. त्यामुळे त्या कामाला गती मिळावी यासाठी पेचकर हे प्रयत्न करत आहेत. खेड तालुक्याच्या हद्दीत येणार्या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्णत्वास आले आहे. मात्र चिपळूण आणि खेड या दोन्ही तालुक्यांच्या मधल्या हद्दीत येणार्या अवघड परशुराम घाटाच्या कामाला अद्याप सुरूवात सुद्धा करण्यात आलेली नाही.
खोत, देवस्थान, ग्रामस्थ आणि कुळ यांच्यातील नुकसान भरपाईच्या वादामुळे रखडलेले मुंबई -गोवा मार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला पोलीस बंदोबस्तामध्ये सुरुवात करण्यात यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी रत्नागिरी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना दिले आहेत. वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला असून सुद्धा केवळ या लोकांच्या आडमुठेपणामुळे कामात अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे धोकादायक झालेल्या परशुराम घाटाचे काम येत्या काळात लवकरच सुरू करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चौपदरीकरणाच्या कामासाठी जी जागा संपादित करण्यात आलेली आहे, त्यासाठी तब्बल ४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. पण त्याच्या वाटणीवरून पेढे-परशुराम येथील ग्रामस्थ, कुळ, खोत आणि देवस्थान कमिटी यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेले वाद अद्यापसुद्धा संपुष्ट येण्याचे चिन्ह दिसून येत नाही. त्यामुळे या वादाच्या ठेकेदार सुद्धा तिथे कामामध्ये आणण्यात येणाऱ्या अडथळ्यामुळे कामाला सुरुवात करायला पुढे धजत नाही. म्हणून घाट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. पण त्याचा नाहक वाहतुकदारांना त्रास सहन करावा लागत आहे.