मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीतील समुद्रकिनाऱ्यांवर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पर्यटकांचा राबता वाढलेला आहे. यंदा पर्यटकांनी उच्चांक गाठलेला आहे. त्यात नाताळ सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांनी दापोलीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे प्रसिद्ध हर्णे बंदरात मासळी खरेदीसाठी पर्यटकांची झुंबड उडालेली आहे. ताजी मासळी खरेदीतून दररोज २ ते ३ लाखांची उलाढाल होत असल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. यंदा सुरमई व पापलेटची आवक कमी झाल्यामुळे पर्यटक प्रामुख्याने कोळंबी खरेदीला प्राधान्य देत आहेत. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीपासून दापोलीत येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. प्रत्येक सलग तीन आठवड्यांच्या शनिवारी, रविवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. दापोलीत आल्हाददायक वातावरण असून, थंडीचा आनंद घेण्यासाठी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुण्यासह काही आंतरराष्ट्रीय पर्यटकही दापोलीत दाखल झाले आहेत.
दाभोळ ते केळशीपर्यंतच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यामुळे नकाशावर दापोली तालुक्याचे स्वतंत्र स्थान आहे. सध्या सुरू असलेल्या नाताळच्या सुटीत किनाऱ्यांवर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झालेली पर्यटनाच्या आहे. सध्या दापोली तालुक्याच्या सर्वच किनारपट्टीभागात तसेच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये पर्यटकांची मोठी वर्दळ आहे. एका रूमसाठी १५०० पासून ते ३ हजार रुपयांपर्यंत पर्यटकांना मोजावे लागत आहेत. ३१ डिसेंबरला निरोप देण्यासाठी आणि नववर्ष स्वागतासाठी किनाऱ्यावरील निवासस्थाने हाऊसफुल्ल झालेली आहेत. दापोलीत आलेला पर्यटक हौं बंदराला भेट दिल्याशिवाय परत जात नाही, हे आता समीकरण झालेले आहे. ताजी मासळी खरेदी आणि कोकणी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक हजेरी लावत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांकडून ताज्या मासळीची मागणी होत आहे. हर्णे बंदरात विविध प्रकारची मासळी मिळते.
पापलेट, सुरमई, बांगडा व कोळंबी या माशांना पर्यटकांची विशेष पसंती असते; मात्र यंदा किनारी भागात वारे वाहत असल्यामुळे आणि थंडीचा कडाका वाढल्यामुळे पापलेट व सुरमईची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे टायनी कोळंबी, चालू कोळंबीसारख्या मासळीच्या खरेदीवर पर्यटकांचा भर आहे. काही पर्यटकांनी लिलावातून मासळी खरेदी केली आहे. हर्णेतील चिमणी बाजारात मासळी खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासून पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे हर्णे बंदरात दररोज २ ते ३ लाखांची उलाढाल होत आहे. महिन्याभरात सुमारे ५० लाखांहून अधिक उलाढाल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे मासळी विक्रेत्यांचे अच्छे दिन आले आहेत. दरम्यान, सुरमई, पापलेटची आवक कमी असल्याने अनेक पर्यटकांनी हॉटेलमध्ये पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी, झिंगा फ्राय, कोळंबी मसाला, कोळंबी करी यावर ताव मारला आहे. सध्या आवक कमी असल्याने पापलेट थाळीचे दर वधारलेले आहेत. थाळीला ५०० रुपये मोजावे लागत आहेत; परंतु, पापलेटची चव चाखण्यासाठी पर्यटकांचा खिसा रिकामा होत आहे.

