रेवस – रेडी सागरी महामार्गातील रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या काळबादेवी खाडी पुलानंतरचा मार्ग समुद्र मार्गे एलीव्हेटेड ब्रीजने नेण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत ग्रामस्थांनी मंजुरी दिल्याने आता या पुलाचे कामही लवकरच सुरु होणार आहे. दरम्यान काळबादेवी खाड़ीतून पाथरदेव मार्गे मुख्य रस्त्याला फ्लायओव्हरने महामार्ग जोडण्याचा प्रस्ताव आता यामुळे रद्दबातल झाला आहे. काळबादेवी रस्ताप्रेमी संघर्ष समितीचा हा मोठा विजय मानला जात आहे. मिऱ्या काळबादेवी पूल झाल्यानंतर जमिनीवरुन महामार्ग नेण्यात येणार होता. त्यासाठी गेली दोन वर्षे अनेक सर्व्हे झाले. मात्र काही घरे बाधित होती. सुरूवातीला ग्रामस्थांनी सव्हें ला विरोध केला तेव्हापासून संघर्ष सुरू झाला होता. यावेळी फ्लायओव्हरचाही प्रस्ताव समोर आला होता. वेळोवेळी मिटींग झाल्या. पालकमंत्र्यांनीही प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांची समजूत काढली. मात्र हा महामार्ग धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला लागून पीर दर्गा ते आरेबारे असा सरळ नेण्यात यावा ही ग्रामस्थांची मागणी कायम होती.
यासाठी ७०० पेक्षा जास्त ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदनही पालकमंत्र्यांना देण्यात आले होते. संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून दिलीप जोशी यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या बरोबरच माजी सरपंच पृथ्वीराज मयेकर, माजी सरपंच जितेंद्र जोशी, सुप्रसिध्द विधीज्ञ अविनाश उर्फ भाऊ शेट्ये, प्रसाद उर्फ बापू गवाणकर, प्रमोद मयेकर, प्रफुल्ल पेटकर, मिलिंद बनप, मिलिंद पारकर, सौ. नंदिनी शेट्ये, बाळकृष्ण मयेकर, श्रीमती संगीता मयेकर, संजय वारेकर, जयवंत मयेकर, बबलू पाटील, राम पाटील, राजेंद्र मयेकर, मुकेश शेट्ये, सरपंच सौ. तृप्ती पाटील, रवी सुर्वे, गणेश वायंगणकर आदी ग्रामस्थांनी तसेच मुंबईकर चाकरमान्यांनी जनजागृती करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
या बैठकीला पालकमंत्र्यांनी दोन्ही गटांना आमंत्रित केले होते. ज्यांना काळबादेवी शाळा ते पाथरदेवचा फ्लायओव्हरने रस्ता हवा होता. त्या ग्रामस्थांनाही बोलावले होते आणि पीर दर्गा ते आरेवारे असा सरळ मार्ग नेण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या ग्रामस्थांनाही पाचारण केले होते. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून पालकमंत्र्यांनी यशस्वी शिष्टाई केली. बहुसंख्य ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करत पीर दर्गा ते आरेवारे धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला समांतर असा एलीव्हेटेड ब्रीजने महामार्ग नेण्यात येईल असे सुचवले आणि सर्व ग्रामस्थांनी त्याला सहमती दर्शविली. गेली काही वर्षे सुरु असलेला वाद यामुळे संपुष्टात आला आहे. मी या तालुक्याचा आमदार आहे. मंत्री आहेच त्यामुळेच साडेसातशे कोटी रुपये या पुलासाठी आणि रस्त्यासाठी मंजुर केले आहेत. काळबादेवी ग्रामस्थांनी त्याचा विकासासाठी सदुपयोग करुन घ्यावा अशी अपेक्षाही पालकमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

