कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्हे, तालुके आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आणि दरडी कोसळल्यामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुरपरिस्थितीमुळे रस्त्यांवर डोंगरच्या डोंगर आल्याने काही ठिकाणी रस्ता खचला असून काही ठिकाणी पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
कोकणात गावागावामध्ये रस्ते खचल्याने, अनेक गावांचा संपर्क तुटला होता. नदीवरचे काही पूल देखील कोसळण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाहून गेलेल्या अथवा घाट माथ्यावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले असून, यासाठी केंद्र सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अशी माहिती ट्वीट करुन दिली आहे.
कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी ५२ कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि ४८ कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे, मुंबई-गोवा हायवेवर चिपळूण जवळील वाशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला असून, त्याची दुरुस्ती लगेचच करुन ७२ तासामध्ये तो पूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. तात्पुरत्या थोडक्या दुरुस्तीची कामे आधी सुरु करण्यात आली असून, कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने करण्यात येणार आहेत असे गडकरी यांनी म्हटले आहे, त्यामुळे जिथे किरकोळ दुरुस्ती असलेले घाट, पूल, रस्ते जसे कि, आंबा घाट, परशुराम घाट, कारूळ घाट या रस्त्यामधील अडथळे दूर करण्यात आले असून, सर्वसाधारण वाहतूक धीम्या गतीने सुरु करण्यात आली आहे.