मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी ते भरणे नाका या दरम्यान एका खासगी टेलिकॉम कंपनीकडून नियमबाह्य पद्धतीने खोदकाम करण्यात आल्याने महाम ार्गाची साईट पट्टी अत्यंत धोकादायक बनली आहे. महामार्गालगत देण्यात आलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन करून थेट साईट पट्टीवरच खोदाई सुरू केल्याचे गंभीर चित्र सध्या दिसून येत आहे. महामार्ग बांधकाम विभागाचे उपअभियंता पंकज गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, महामार्गालगत टेलिकॉम कंपनीला केबल टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आर.ओ. डब्ल्यू. पासून निश्चित केलेल्या चार मीटर अंतरावरच खोदकाम करण्याची अट असताना, संबंधित कंपनीने अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या अवघ्या दोन मीटर, तर काही ठिकाणी सिमेंट रस्त्याला अगदी एक फुट अंतरावरच खोदकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, महामार्गाची साईट पट्टी कमकुवत होऊन अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात अभियंता पंकज गोसावी यांनी चुकीच्या पद्धतीने खोदाई झाल्याचे मान्य करत, संबंधित ठेकेदारांना तात्काळ काम थांबवण्याच्या सूचना देणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित टेलिकॉम कंपनीने नियमबाह्य खोदकाम करून टाकलेली केबल तात्काळ काढून टाकावी, परवानगीनुसार निश्चित अंतरावरच खोदकाम करून केबल टाकावी, तसेच महामार्गालगत खोदून उकरलेली माती रोलर फिरवून पूर्ववत सुस्थितीत करावी, अशी ठाम मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यासोबतच संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या विरोधात येत्या २६ जाने. रोजी खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

