मुंबई-गोवा महामार्गाचे काम काही ठेकेदारांच्या रखडले आहे. २०१२ पासून हे काम सुरू आहे. याला महायुतीचे एकच सरकार जबाबदार नाही. या महामार्गाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्र्यांनी देखील खेद व्यक्त केला. परंतु आता डिसेंबर २०२४ पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या चिपळूण दौऱ्यावर आलले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई-गोवा महामार्गाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार आले, तर या रखडलेल्या महामार्ग पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते.
याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, २०१२ मध्ये या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी शरद पवार यांचे सरकार होते. केंद्रात पवार मंत्री होते. त्या सरकारमध्ये मलाही काम करण्याची संधी लाभली होती. तेव्हापासून या महामार्गाच्या कामामध्ये काही स्थानिकांचे प्रश्न, ठेकेदारांचे प्रश्न, तसा भूसंपादनाच प्रश्न होते. तसे अजूनही काही दावे न्यायालयात चालू आहेत. महामार्गाच्या कामातील काही ठेकेदारांनी चुकीची कामे केल्यामुळे महामार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे शरद पवार जर कामाबाबत नाराजी व्यक्त करत असतील तर त्याला एक सरकार जबाबदार असू शकत नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.