गेली अनेक वर्षे खड्ड्यांचा मारा सोसत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जून २०२५ अखेरपर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याची शाश्वती दिली आहे. तशा सूचना वरिष्ठांकडून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत तसेच पावसाळ्यापूर्वी संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग विभागाचा आहे, अशी माहिती या विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली. गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग हा रखडलेला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात हा महामार्ग जूनअखेर पूर्ण होईल, असे सांगितले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जून २०२५ पर्यंत चौपदरी मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येईल. सध्या गोव्याला रस्त्याने जाण्यासाठी बारा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
हा वेळ नव्या चौपदरी महामार्गामुळे सहा तासांवर येईल. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. त्याप्रमाणे काम चालू आहे. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा या भागातील रस्त्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल. महामार्गाचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत. या दरम्यान येणारे जोडरस्ते दोन महिन्यांत पूर्ण होतील; मात्र लांजा, पाली आणि संगमेश्वर येथील पुलांचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. या तीन मोठ्या पुलांवरून वाहतूक सुरू झाली नाही तरी सेवा मार्ग दोन महिन्यांत तयार होईल. एकूणच पुढील दोन महिन्यांत महामार्ग तयार झालेला असेल.
उड्डाणपुलासाठी वर्षाचा कालावधी – चिपळूण शहरातून जाणारा उड्डाणपूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी किमान वर्षाचा कालावधी लागेल. शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या पिलरचे काम झाले आहे. त्यावर गर्डर बसवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. तोपर्यंत सेवा मार्गावरून वाहतूक सुरू राहणार आहे.