मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग मागील चौदा वर्षांपासून रखडला आहे. त्याचा फटका कोकणातील पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला बसला आहे. महामार्गावरून मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना बारा ते पंधरा तासांचा विलंब सहन करावा लागत आहे. आता राज्याने जानेवारी २०२६ अशी महामार्ग पूर्णत्वाची नवीन तारीख दिली आहे; मात्र कामाची गती पाहता चौपदरीकरण पूर्णत्वासाठी आणखी दोन वर्षे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास खडतरच राहण्याची शक्यता आहे. सलग सुटीच्या हंगामात कोकण बहरलेले असते. गोव्याकडे जाणारे पर्यटकही रत्नागिरी, सिंधुदुर्गात थांबतात. त्यामुळे सुटीच्या हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते; मात्र सध्या रस्ते खराब असल्यामुळे गोव्याकडे जाणारे पर्यटक रेल्वे आणि हवाई वाहतुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे सुटीच्या हंगामातील उलाढाल कमी झाली आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग उभारणीसाठी ९३६.२५ कोटींचे ५२ उद्योग आणि सिंधुदुर्गात ३१३.५६ कोटींचे ४३ उद्योग प्रस्तावित केले आहेत.
या उद्योगातून रत्नागिरीत १ हजार १२५ आणि सिंधुदुर्गात ८७२ थेट रोजगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास उद्योग क्षेत्रालाही गती मिळेल, तसेच पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल. मुंबई ते गोवा महामार्ग मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही सरकारकडून दिली होती; परंतु चौपदरीकरण कामाची गती धीमी राहिल्याने यंदा शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील दुपदरी रस्ता तसेच माणगाव आणि इंदापूर शहरांमध्ये प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. यामध्ये चाकरमान्यांना चार ते पाच तास नाहक अडकून पडावे लागत आहे.
हातखंबा, पाली, लांजातील काम संथगतीने – कशेडी ते लांजा या टप्प्यातील खेड रेल्वेस्थानक पुलाचे काम अपूर्ण आहे. परशुराम घाटातील कामही अद्याप शिल्लक आहे. चिपळूण शहरातील पुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. लांजा शहरातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. पाली शहरातही उड्डाणपुलाचे केवळ खांब उभारले आहेत, तर हातखांबा येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे, तसेच संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचेही काम धीम्या गतीने सुरू आहे.