देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनी शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत जाहीर सभा घेतली. महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या या सभेत त्यांच्या रडारवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच होते. उद्धव ठाकरेंना अनेक सवाल विचारत अमित शाहांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली असल्याचा टोला देखील लगावला होता. अमित शाहांच्या या भाषणानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून उद्धव ठाकरेंविषयी मतदारांमध्ये असलेली सहानुभूती जाणवू लागल्यामळेच अमित शाहांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे.
अमित शाहांनी भाषणाची सुरुवातच खरी शिवसेना कुणाची हे ठरवणारी ही निवडणूक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी अनेक प्रश्न विचारत उद्धव ठाकरेंवर राजकीय हल्लाबोल चढवला. नकली शिवसेना असे म्हणत उद्धव ठाकरेंवर अमित शहांनी टीकेची तोफ डागली. एवढेच काय तर बाळासाहेबांचा राजकीय वारसा राज ठाकरे, एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर जी नाराजी शिवसेनेच्या समर्थकांमध्ये आहे ती निवडणुकीत भारी पडू शकते, हे लक्षात आल्याने अमित शाहा यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंना लक्ष केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. हिंदूत्व सोडल्याची टीकादेखील याच कारणातून केली गेली, असाही अर्थ लावला जात आहे.
कोकण हा कायमच शिवसेनेचा गड राहिला आहे. मात्र शिवसेना फ टल्यानंतर कोकणचा कौल कुणाच्या बाजूने असेल हे या निवडणुकीत स्पष्ट होणार ‘आहे. नेतेमंडळी फुटली, साम् ान्य शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबतच आहे, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे ज्यांनी शिवसेनेत फूट पाडली त्यांच्याविरोधात संतापाचे वातावरण असल्याचे बोलले जाते. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही याच संतापाचा फायदा निवडणुकीत मिळवण्यासाठी रणनिती आखली गेली असल्याची चर्चा सुरू आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर जी काही सहानुभूती ठाकरे गटाच्यासोबत आहे असे बोलले जाते ती महायुतीसाठी आव्हानात्मक ठरू शकते आणि त्यामुळेच नकलीं शिवसेना, राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे हे असली राजकीय वारस असे सांगण्याचा प्रयत्न महायुतीकडून होताना दिसतो आहे, असे आता मतदारांमध्ये बोलले जाते आहे. अमित शाहांचे भाषण हे याच रणनितीचा एक भाग होते असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. सहानुभूती आहे की नाही आणि असेल तर तिचा फायदा ठाकरे गटाला मिळेल का? सहानुभूतीची ही लहर ओसरविण्यात महायुती यशस्वी होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य मतदार ७ मेला देणार असंला तरी त्याचा निकाल ४ जूनला लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत वाट पहावी लागणार असून निवडणुकीतील मतदानानंतरही याची चर्चा सुरूच राहील हे स्पष्ट दिसते आहे.