दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई लक्षात घेता, सर्वच बाबतीत आर्थिक अडचणी समोर यायला लागल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढत्या महागाईचा फटका बसायला सुरुवात व्हायला लागली आहे. त्यामुळे व्यावसायिक इंधनवाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने, रत्नागिरीतील हॉटेल्स व्यवसायिकांना वाढत्या महागाई चा फटका बसत आहे. नाईलाजाने हॉटेल्सच्या पदार्थांची दरवाढ करण्याचा निर्णय काल हॉटेल लँडमार्क येथे झालेल्या हॉटेल व्यवसायिकांच्या सभेमध्ये घेण्यात आला आहे.
कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खाद्य पदार्थांची विक्री केली जात होती. त्यामुळे इतर स्थायी खर्च तिथे उद्भवत नव्हते. परंतु, आता शासनाने पेट्रोल डिझेल दरवाढ त्यामुळे वाढलेले वाहतुक भाडे, भाजीपाला, इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, गॅसच्या किमती २००० च्या वर पोहोचल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा चांगलाच फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे.
मोठ्या हॉटेल्समधून विविध प्रकारचे पदार्थ ऑनलाईन उपलब्ध होते. परंतु, अनेक मध्यमवर्गीय हॉटेल व्यवसायिकांनी आपली लहान हॉटेल्स कायमस्वरूपी बंद केली आहेत. अनेक हॉटेल्स व्यावसायिक अद्याप या धक्क्यातून सावरून पुन्हा आर्थिक अडचणीमुळे उभेच राहू शकले नाहीत. या सर्व बाबींचा विचार कालच्या मीटिंग मध्ये करण्यात आला. त्यामुळे सर्वानी या परिस्थितीला एकजुटीने आणि धैर्याने सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती दरवाढ करणे गरजेचे असल्याचे मत सर्वानुमते स्पष्टपणे मांडण्यात आले. त्यानुसार १० ते २० टक्के दरवाढीचा निर्णय सर्वानुमाते घेण्यात आला.
कालच्या सभेमध्ये रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायिक व हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी बहुमोल मार्गदर्शन उपस्थित व्यवसायिकांना केले. कोरोनामुळे खच्चीकरण झालेले अनेक रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायिक या सभेसाठी उपस्थित होते.