कोरोना महामारी मुळे राज्यातील बंद असलेल्या हॉटेल्स रेस्टॉरंट यांना १५ ऑगस्ट पासून निबंधामध्ये शिथिलता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत झाला. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि त्यातीलच एक दिलासादायक बातमी हॉटेल व्यवसायिकांना मिळाली आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट पासून राज्यातील सर्व ठिकाणी रेस्टॉरंट, हॉटेल्स, शॉपिंग मॉल यासह सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हॉटेल्समधील ग्राहकांची क्षमता मात्र ५०% इतकीच ठेवण्यात आलेली आहे.
लग्नसमारंभासाठी उपस्थितांची मर्यादा ही २०० माणसांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ही मर्यादा खुल्या जागेवर होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठीच आहे. जर लग्न समारंभ हॉलमध्ये होत असेल तर हॉलच्या निम्म्या क्षमतेच्या उपस्थित किंवा जास्तीत जास्त १०० माणसांच्या उपस्थित विवाह सोहळे संपन्न केले जाऊ शकतील. येत्या १५ ऑगस्टपासून या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे
लसीचे दोन डोस आवश्यक !
नागरिकांना मॉल मध्ये जाण्यासाठी लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झाले असतील तरच प्रवेश करता येऊ शकेल. १५ ऑगस्ट पासून शॉपिंग मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी सर्व कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनी देखील लसीचे दोन डोस घेतले असणे अत्यावश्यक असल्याची माहिती आरोग्यमंत्री ना राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.