पावसासह अरबी सुमद्राला आलेल्या मोठ्या भरतीचा तडाखा मंडणगडमधील वेळास आणि दापोलीतील अडखळ मोहल्ला परिसराला बसला आहे. अडखळ मोहल्ला येथील किनाऱ्यावरील घरात समुद्राचे पाणी शिरले आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर उभ्या असलेल्या ३ नौका वाहून किनाऱ्यावरील घरात घुसल्या आहेत. लाटांचे तांडव रत्नागिरीत राजिवडा, मिऱ्यासह गुहागर तालुक्यातील किनाऱ्यांवर पाहायला मिळाले. लाटांच्या तडाख्याने वेळास गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, बाणकोटपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर वेळासला जोडणारा हा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. अमावास्येमुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या लाटा उठण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. २६) मोठ्या भरतीवेळी समुद्राला आलेल्या उधाणाच्या लाटांचे तांडव किनारी भागात पाहायला मिळत होते. आज सकाळी आलेल्या मोठ्या भरतीचा तडाखा दापोली तालुक्यातील अडखळ जुईकर मोहल्ला येथील सुमारे ११०० मीटर लांबीच्या किनारी भागात ठिकठिकाणी उधाणाचे पाणी शिरले आहे.
समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील घरांमध्येही शिरले असून,दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. किनारी भागामध्ये लोकवस्ती आहे. अडखळ किनारी गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या अवस्थेत असलेल्या मच्छीमारी नौकांपैकी ३ नौका पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोहल्ल्यात शिरल्या होत्या. तसेच काही नौका फुटल्या असून, त्याचे अवशेष किनाऱ्यावरील घरांच्या भिंतीवर येऊन धडकत आहेत. त्यामुळे घरांच्या भिंतींचे नुकसान झालेले आहे. किनाऱ्यावर आलेल्या नौकांच्या तडाख्यामुळे संरक्षक भिंतही कोसळली आहे. राजिवडा येथे संरक्षक बंधाऱ्याचे काम अपूर्ण असल्यामुळे लाटांचे पाणी काही प्रमाणात किनाऱ्यावरून आत शिरलेले होते; परंतु त्यामुळे लोकवस्तीला धोका पोहोचलेला नाही. काजळी खाडीकिनारीही दुपारी उधाणाचे पाणी किनाऱ्यावरील शेतजमिनीत शिरले होते. त्यामुळे नुकसान झालेले नाही.
पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षाच ! – वेळास किनाऱ्यावरील प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे. सागरौ महामार्गावरील बाणकोट-बांगमांडला पुलाचे काम पूर्ण झाल्यावर वेळास रस्त्याचा विस्तार होणार आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.