अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानचा घटस्फोट झाल्यानंतर सध्या तो सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये हृतिक आणि सबाच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. हृतिक-सबा अनेकदा एकत्र दिसेल आहेत, मात्र या दोघांनीही त्यांच्या या रिलेशन बद्दल अजून कोणताच अधिकृत खुलासा केलेला नाही.
हृतिक-सबाच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, “दोघेही एकमेकांना पसंत तर करतात, परंतु त्यांना या नात्यासाठी पुरेसा वेळ हवा आहे. कोणताही निर्णय त्यांना घाई गडबडीत घ्यायचा नाही आहे. हृतिकच्या कुटुंबालाही सबा खूप आवडली आहे. हृतिकप्रमाणेच त्याच्या कुटुंबालाही सबाचे संगीत काम आवडते. काही दिवसांपूर्वी सबा आझाद जेव्हा हृतिकच्या घरी गेली तेव्हा सबाने सगळ्यांसाठी गाणी म्हटली होती.
हृतिक आणि त्याच्या कुटुंबाने तिचे गाणे खूप एन्जॉय केले होते. हृतिक आणि सबा एकत्र आहेत, पण त्यांना त्यांचे नाते पुढे नेण्यासाठी घाई गडबड करायची नाही. याचा अर्थ दोघांना अजून लग्नाची घाई नाही. पण, दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्ताला त्यांच्या जवळच्या मित्राने दुजोरा दिला आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची भेट एका ऑनलाइन डेटिंग अॅपवर झाल्याची माहिती समोर आली आहे.
पण नवीन रिपोर्ट्सनुसार दोघांच्या मैत्रीची सुरुवात ट्विटरवरून झाली. रिपोर्टनुसार, दोघेही गेल्या २-३ महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हृतिकने सबाचा गाण्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता, तेव्हापासून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली होती. आता दोघेही एकमेकांच्या पोस्टवर प्रेमळ कमेंट करताना दिसतात. आतापर्यंत दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. सबा आणि हृतिकची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान यांचेही चांगले बाँडिंग आहे. अशा प्रकारे या दोघांच्या भेटीगाठीमुळे त्यांच्या लग्नाच्या अफवा वेगाने व्हायरल होत आहेत.