रत्नागीरी शहर परिसरामध्ये अनेक वर्षापासून रुग्णांची सेवा करणारे डॉ. चव्हाण यांचे स्वस्तिक हॉस्पिटल स्थित आहे. स्वस्तिक हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.रमेश चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र डॉ. नितीन चव्हाण आणि आनंद फडके यांनी प्रशासनाला मदत म्हणून कोरोना संक्रमणाच्या या काळामध्ये एकही रुपया न घेता आपले सुसज्ज आणि अद्ययावत हॉस्पिटल प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे.
सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन बैठकीमध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, बाबू म्हाप, रत्नागिरी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवार, आम. राजन साळवी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी गाजुलवार उपस्थित होते.
ना. उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांसमोर महाराष्ट्रामध्ये आदर्शवत ठरावे असे उदाहरण म्हणजे रत्नागिरीतील डॉ. चव्हाण व आनंद फडके यांनी समाजासमोर ठेवले आहे अशा शब्दात कौतुकास्पद वक्तव्य केले. जुन्या पिढीपासून आजपर्यंत डॉ. रमेश चव्हाण आणि त्यांच्या पुढच्या पिढीने तसेच कुटुंबीयांनी जी काही अविरत रुग्णसेवा केली आहे ती नक्कीच आदर्श घेण्यासारखी आहे.
रत्नागिरीतील आपले अद्ययावत हॉस्पिटल त्यांनी कोरोना काळात मदत म्हणून प्रशासनाच्या ताब्यात दिले आणि तेही मोफत, संपूर्ण महाराष्ट्रासाठी रत्नागिरीतील या डॉ. चव्हाणांच्या कुटुंबाने दाखविलेले औदार्य अभिमानस्पद आहे. ना. सामंत यांनी त्यांच्या केलेल्या कौतुकावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा डॉ. चव्हाण कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे डॉ. चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे सांगितले.