कुणीही यावे गोड गुलाबी आश्वासन द्यावे आणि फसवून जावे… अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे… टिडब्लूजेच्या हजारो कोटींच्या फसवणुकीनंतर आता एकाने शेकडो महिलांना लक्ष करीत शिलाई मशिन्सच्या नावाखाली लाखो रुपये उकळले असून फसवणाऱ्याला काही लोकांनी चांगलेच बुकलले आणि पोलिसाच्या ताब्यात दिले. त्यानंतर महिलांचीं चिपळूण पोलीस स्थानकात मोठी गर्दी झाली होती. परिसरातील संशयित आरोपीने महिलांसाठी योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून शेकडो महिला आर्थिक जाळ्यात अडकल्या आहेत. प्रत्येकी ५०० ते १२०० तर काहींकडून १६०० रुपये जमा करून त्या मोबदल्यात प्रत्येकाला शिलाई मशिन्स देण्याचे आश्वासन योजनाकर्त्यांने दिले होते. प्रांताधिकारी कार्यालयांनजीक संशयित आरोपीने ऑफिस थाटले होते. या ठिकाणी महिलांची नोंदणी करण्यात येत होती. यासाठी महिला कर्मचारी नेमण्यात आली होती. किमान ४ महिने महिलांची नाव नोंदणी या ठिकाणी करण्यात येत होती. तर अन्य ठिकाणीही नाव नोंदणीची जबादारी काही महिलांकडे सोपविण्यात आलो होती असे बोलले जाते.
आज वाटप होणार होते – चार महिने झाले तरी मशिनस मिळत नाही म्हणून महिलांची ओरड सुरू होती. सोमवारी १५ डिसेंबर रोजी शिलाई मशिन्सचे वाटप केले जाणार आहे. असे मेसेज गेल्याने अनेक महिला या कार्यालयात गोळा झाल्या होत्या. मात्र आज मशिन्स मिळणार नसल्याचे समजताच महिला वर्ग आक्रमक झाला होता.
प्रचंड गोंधळ – मोठ्या संख्येने आलेल्या महिलांनी गोंधळ सुरू केला. त्यात महिलांसोबत आलेल्या काही पुरुषांनी ‘त्या’ व्यक्तिला चांगलाच प्रसाद दिल्याची चर्चा सुरू आहे. उडालेला गोंधळ चिपळूण पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्या व्यक्तिला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले.
लाखों रुपये लाटले – हजारो महिलांनी यामध्ये पैसे दिले आहेत. केवळ ५०० आणि १६०० रुपयात मशिन्स मिळत असल्याने हजारो महिलानी पैसे जमा केले आहे. यामध्ये केवळ चिपळूण शहरातील किमान ६०० महिलांचा समावेश असून तशी नोंदही नावाच्या यादिसह पोलिसांना देण्यात आली आहे.
गर्दी तशी रक्कम वाढली – या व्यक्तिने सुरवातीला ५०० रुपये शिलाई मशिन्स मिळणार असे सांगितले मात्र त्या नंतर जस जशी गर्दी वाढू लागली तसं तशी रक्कम वाढत ती सोळाशे पर्यंत करण्यात आली होती. शासनाची योजना असल्याचे भासवून पैसे आणि आधारकार्ड आणि फॉर्म भरून घेतले जात होते. महिलांच्या नाव नोंदणीसाठी महिला कर्मचारी नेमण्यात आले होते. काम मिळत नसल्याने तात्पुरतं तरी काम करू या भावनेने काम करीत असलेल्या महिला कामगारांना तीन महिने पगारच दिला नसल्याचे सामोरी आले असून त्यांचीही फसवणूक आरोपीने केली आहे. सोमवारी या साऱ्या महिला मोठ्या संख्येने चिपळूण पोलीस स्थानकात आल्या होत्या.
पोलीस स्थानकात तक्रार – या संदर्भात मनीषा खेडेकर यांनी या व्यक्ति विरोधात पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली असून महिलांची फसवणूक करण्यऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तर महिलांनी ही कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

