जगभरामध्ये सुरु असलेल्या ओमायक्रॉन या नव्या कोरोना व्हेरीयंटच्या धोक्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात सध्या तरी एकही या व्हेरीयंटचा रुग्ण नसल्याने काहीही चिंतेची बाब नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतात कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, गरज भासल्यास नवीन कोरोना प्रकारासाठी वेगळी अजून प्रभावशाली कोविशील्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. कोविशील्ड लस नवीन प्रकाराविरूद्ध किती प्रभावी आहे हे येत्या २-३ आठवड्यांमध्ये कळेलच. अशा परिस्थितीमध्ये, आवश्यक असल्यास, ओमायक्रॉनचे संकट लक्षात ठेवून बूस्टर डोस देखील शक्य आहे, असे मत अदर पूनावाला यांनी मांडले आहे.
यासंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील संशोधन करत आहेत, त्यांच्या संशोधनाच्या आधारे आम्ही एक नवीन लस बनवण्याचा विचार करू शकतो, जी बूस्टर डोस म्हणून काम करेल. संशोधनाच्या आधारे, आम्ही लसीचा तिसरा आणि चौथा डोस देण्याबाबत निर्णय घेण्यास सक्षम होऊ, असे पूनावाला यांनी म्हटले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ओमायक्रॉन प्रकाराशी लढण्यासाठी विशिष्ट लसीची गरज आहेच, असे नाही. तसेच पूनावाला म्हणाले की बूस्टर डोसची आवश्यकता असल्यास, कंपनीकडे आधीच पुरेसे डोस आहेत, जे त्याच किंमतीत उपलब्ध करून दिले जातील.
सध्या आमच्याकडे लाखो डोस स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. आम्ही भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २० कोटी डोस आरक्षित करून ठेवले आहेत. भविष्यात बूस्टर डोस लागू करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने सध्यातरी स्पष्ट केले आहे. जर सरकारने बूस्टर डोस जाहीर केलाच, तर आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध आहेत. सध्या प्राधान्याने कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही अदर पूनावाला यांनी सांगितले.