नेत्रावती व मत्सगंधा या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वररोड रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी गेली तीन वर्षे संगमेश्वरवासीय आणि समस्त कार्यकर्ते सातत्याने लढा देत आहेत. मात्र अद्याप या प्रश्नासंदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेतला जात नाही. यासाठी आता राज्य रेल्वे मंत्रालयाचे दरवाजे ठोठवण्यात येत असल्याचे निवेदन निसर्गम्य चिपळूण, आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे, कोकण रेल्वे प्रशासन ते रेल्वे मंत्री, माननीय पंतप्रधान कार्यालयापर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला आहे. पण अद्याप आम्हाला सकारात्मक उत्तर मिळाले नाही. आमच्या या आंदोलनास संगमेश्वर तालुक्यातील जनता व सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. या संबंधीत आंदोलनामध्ये २६ जानेवारी २०२२ रोजी संगमेश्वर रोड स्थानकात दोन दिवसाचे उपोषण सुद्धा झाले आहे. तरीही कोकण रेल्वे ठराविक साचेबंद उत्तरे देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

या एक्स्प्रेस गाड्यांमधील नेत्रावती एक्स्प्रेसला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकामध्ये महिन्यातील २३/२४ दिवस दशलहपळलरश्र करश्रीं असतो असा स्टेशन मास्तरांचा अहवाल असून देखील संगमेश्वर तालुक्यातील जनतेला या सुविधेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. याआधी चर्चगेट मुंबई येथील आपल्या जन शिकायत कार्यालयात संयुक्त बैठकीसंदर्भात हजारोंच्यावर विनंती अर्ज केले. तसेच आता आपल्या दिल्ली येथील कार्यालयात संगमेश्वरवासीय जनतेचे हजारो विनंती अर्ज पाठवले आहेत. गेले तीन वर्षे सातत्याने पत्रव्यवहार करूनही संगमेश्वरवासियांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने रेल्वे राज्यमंत्र्यांनी तातडीने बैठक आयोजित करावी यासाठी हे निवेदन सादर केले आहे. बैठकी संदर्भातही कोणताही निर्णय घेण्यात आला नाही तर नाईलाजाने संगमेश्वरमधील जनतेला रेल रोको आंदोलनासारख्या हत्याराचा वापर करण्यावाचून पर्याय उरणार नाही असेही निवेदनात संदेश जिमन म्हटले आहे.