राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व भरारी पथक रत्नागिरी यांच्या पथकाने गेल्या महिन्यात धडक कारवाई करत गोवा राज्यातील विदेशी मद्याचे एकूण ६ गुन्हे दाखल केले. यामध्ये एकूण ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पथकाने दिली. गेल्या महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुरूच होती; परंतु पंधरा ऑगस्ट आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्यावर धडक कारवाई सुरू होती. त्यासाठी महामार्गावर विविध ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाची पथके आणि रत्नागिरी विभागाच्या निरीक्षकांचे पथक व भरारी पथक कार्यरत होते. मिळालेल्या माहितीवरून, या पथकाने गेल्या महिन्यात एकूण ६ ठिकाणी कारवाई केली.
यामध्ये राजापूर तालुक्यातील नाटे, पाचल व राजापूर शहर आदी ठिकाणी या कारवाया झाल्या. यामध्ये गोवा राज्यांतील विदेशी मद्याचे एकूण ६ गुन्हे नोंद करून ६ लाख ४ हजार ११०चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई विभागीय उपआयुक्त कोल्हापूर विभाचे विजय चिंचाळकर, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी निरीक्षक आर. जी. मोरे, भरारी पथक निरीक्षक ए. ए. पाडळकर, दुय्यम निरीक्षक एस. ए. जाधव व दुय्यम निरीक्षक जी. सी. जाधव, जवान एन. एन. सुर्वे, एन. जे. तुपे, सागर उबाळे, रोहित लोंढे, मलिक धोत्रे यांनी ही कारवाई केली.