बांगलादेशी नागरिकास कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये शिरगाव ग्रामपंचायतीमधून जन्मदाखला दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषदेकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे. दोन दिवसांत त्याचा अहवाल येणार असून, त्यानंतर तत्कालीन ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली. एटीएसची स्थानिक पथकासह स्थानिक पोलिसदेखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोणतीही चौकशी न करता बांगलादेशी नागरिकाला तत्कालीन ग्रामसेवकांनी जन्म दाखला दिल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. कोरोना महामारीमध्ये प्रशासकीय काम थांबले असतानाही हा दाखला देण्यात आला. याची चौकशी जिल्हा परिषदेमार्फत गटविकास अधिकारी करत आहेत. तीन दिवसांत त्याचा अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ ग्रामसेवकाला निलंबित केले जाणार आहे.
हा दाखला दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाबाबतची कोणती कागदपत्रे तयार केली आहेत का, यासह आधार कार्ड व अन्य कागदपत्रे तयार केलीत का, याचीही चौकशी सुरू झाली आहे. एटीएसचे स्थानिक पथक आणि शहर पोलिसांच्या एका वेगळ्या पथकाने सर्व कागदपत्रांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामसेवक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईसह एटीएसची स्वतंत्र कारवाई होण्याची शक्यता आहे. बांगलादेशी व्यक्तीकडे असणारा मोबाईल कशा पद्धतीने त्याने मिळवला याचीही चौकशी पोलिस यंत्रणा करत आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संबंधित ग्रामसेवकाची चौकशी केल्यानंतर त्याने चुकून झाल्याचे वरिष्ठांना सांगितल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न : योगेश कदम – ग्रामपंचायतीतून दाखले देताना संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. बांगलादेशामधून येऊन कोकणात वास्तव्य करणाऱ्या लोकांकडे ग्रामपंचायतीपासून इतर अनेक यंत्रणांकडून दाखले सापडणे, ही बाब गंभीर आहे. हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, अशी चिंता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली. कदम म्हणाले, “खोटे दाखले परप्रांतीय लोकांकडे आढळून येणे ही गंभीर बाब आहे. ज्या देशातून हे लोक भारतात येतात त्या देशाचा पासपोर्ट फाडून टाकून इथली नवीन कागदपत्रे बनवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्या वेळी ते बनावट कागदपत्रे सादर करतात आणि रेशनकार्ड, आधारकार्ड, ग्रामपंचायत दाखले घेतात. गैरमार्गाने मिळवलेले दाखले कोणाकडे आढळून आल्यास ते देणाऱ्यालाही जबाबदार धरले जाईल. संबंधित विभागाला तशा सूचनाही देणार आहोत.”