दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, घरोघरी सणाच्या तयारीची लगबग सुरू झालेली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे यंदा फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याच्या खर्चातही वाढ झाली असून, सामान्य ग्राहक काटकसरीकडे वळला आहे. दिवाळी सणात विविध पदार्थ तयार केले जातात. यावर्षी खाद्यतेलाचे दर जरी नियंत्रणात असले तरीही डाळी, साखर, रवा, मैदा, शेंगदाणे यांच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे सण साजरा करताना होणारा खर्च भरून काढण्यासाठी अन्य खर्चावर नियंत्रण ठेवावे लागते. सध्या नेहमीच्या किराणा विक्रेत्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे. नोकरदार मध्यमवर्गीय कुटुंब मात्र मॉलमधील खरेदीवर असलेली ऑफर मिळवण्यासाठी गर्दी करत आहेत.
महागाईमुळे सण साजरा करताना खरेदीवर मर्यादा आली आहे. हरभरा डाळ, तुरडाळ, साखर, गूळ, बेसन, रवा, मैदा, शेंगदाणे, चुरमुरे, पोहे यांसह तिळाचे तेल, सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, पामतेल, राईसतेल आदींना ग्राहकांकडून मागणी आहे. ही खरेदी करतानाही ग्राहक हात आखडता घेत असून, तयार पदार्थांकडे कल अधिक वळलेला आहे. खरेदीपूर्वी किमतीचा विचार ग्राहकांकडून केला जात आहे. आरोग्याला प्राधान्य देत तेलकट, गोड, चमचमीत पदार्थांएवजी कमी गोड पदार्थांना प्राधान्य दिले जात आहे. साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो. खर्च नियंत्रणावर विशेष भर दिला जात आहे. दिवाळीचा सण साजरा करताना अनेक ग्राहक वर्षभर बचत करून त्यामधून खर्च करतात. महागाईमुळे यावर्षी बचतीच्या दुप्पट खर्च होत आहे.
वाढलेल्या दरांमुळे खर्चात काटकसर – गतवर्षीच्या तुलनेत डाळी, साखर, रवा, मैदा, पोहे, शेंगदाणा दरात घसघशीत वाढ झाली आहे. पिठीसाखर ६५ रु. किलो, बेसन १४० रु. किलो, साखर ४५ रु. किलो, जेमिनी तेल १६७, तूरडाळ १६०, पोहे ५७, सुके खोबरे ३७०, गूळ ९०, रवा ४६ रुपये दर आहेत. त्यामुळे सणासाठी पदार्थ तयार करण्यासाठी खर्चावर मर्यादा आली आहे. महागाईमुळे अधिकचा खर्च भागविण्यासाठी ग्राहकांना अन्य खर्चात काटकसर करावी लागत आहे.

