पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेकडील ४ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन पसार झालेल्या तोतयाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. जहीर अब्बास सलीम काझी (वय ४०, रा. दर्याजवळ, बनेली, टिटवाळा, जि. ठाणे) असे संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. त्याच्याकडून सोन्याच्या बांगड्या व चोरीची दुचाकी, असा ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, रुकैया इब्राहिम साबळे (वय ७१, रा. रोझी प्लाझा, मु. पो. काविळतळी, चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी याबाबत फिर्याद दिली होती.
त्या दि. २३ जून २०२५ रोजी मिरजेतील शिवाजी रोडवरून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी संशयित काझी व त्याचा साथीदार दुचाकीवरून आले. त्यांनी साबळे यांना, ‘पुढे अपघात झाला असून तपासणी सुरू आहे. तिथे आमचे साहेब आहेत. ते तुम्हाला विचारतील. तुमच्या हातातील बांगड्या काढून ठेवा’, असे म्हणून हातचलाखीने त्यांच्या बांगड्या काढून घेऊन धातूची गोल वस्तू कागदात गुंडाळून त्यांच्या हाती दिली व ते पसार झाले. काही वेळानंतर साबळे यांनी बांगड्या तपासल्या असता, त्या बनावट धातूच्या असल्याचे दिसून आले.
दोन गुन्हे उघडकीस – संशयित काझी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याकडून मिरजेतील महिलेची फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आला. तसेच त्याने पुणे येथील सहकार पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली.