तालुक्यातील नांदीवसे गावात राधानगर वाडीच्या डोंगराला प्रचंड भेगा पडल्या असून काही ठिकाणी डोंगर खचू लागला आहे. भेगा अतिशय वेगाने रुंदावत असल्याने येथील सुमारे २०० हुन अधिक घरांना धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांची भीतीने गाळण उडाली आहे. येथील काही कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. शासनाने सर्व खर्च करावा तरच स्थलांतर करू, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चिपळूण तालुक्यातील नांदीवसे गाव हे डोंगराळ भागात वसलेले गाव आहे. येथील राधानगर वाडी तर डोंगराच्या पायथ्याशी असून येथे सुमारे २०० हुन अधिक घरे आणि साडेतीनशे लोकवस्ती आहे. येथील भला मोठा डोंगर आता धोक्याची घंटा वाजवू लागला आहे.
डोंगराला भेगा – प्रत्यक्षात २००५ पासून या डोंगराला भेगा पडण्याससुरुवात झाली होती. मात्र त्यावेळी भेगांचे प्रमाण कमी होते. या भेगा आता वेगाने वाढत आहेत. सुमारे ३ कि.मी अंतराला भेगांनी वेढा घातला असून ७ ते ८ फुट इतकी खोली भेगांना आहे. भेगा रुंदावत असून काही ठिकाणी डोंगर खचला आहे. खचलेला भाग सरकत निघाला असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. खचत असलेला भाग कधीही खाली येण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशी कमालीचे घाबरले आहेत.
पायथ्याशी शेकडो घरे – डोंगराच्या पायथ्याशी २०० हुन अधिक घरे आहेत. तर ज्या ठिकाणी डोंगर खचत आहे त्याच्या बरोबर खाली सुमारे ८० घरे आहेत. त्यामुळे या सर्व कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची दखल घेत २० ते २२ कुटुंबांना स्थलांतर होण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. परंतु फक्त याच कुटुंबांना धोका आहे असे नव्हे तर संपूर्ण वाडीला धोका असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे फक्त त्याच ८० कुटुंबांना स्थलांतर करून उपयोग होणार नाहीत संपूर्ण वाडीचा विचार झाला पाहिजे, असेही ग्रामस्थ सांगत आहेत.
शासनाने खर्च करावा – येथील ग्रामस्थ स्थलांतरित होण्यास तयार देखील आहेत. परंतु शासनाने सर्व खर्च करून सर्वसोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि जवळच पुनर्वसन करावे अशी त्यांची मागणी आहे. शेती, गुरेढोरे, जागा जमिनी येथे असल्याने अन्य कुठेही स्थलांतर होता येणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र येथील धोका पाहता प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.