संजय राऊतांचे शरद पवारांना खुर्ची देण्यासाठी धावपळीचे प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. संजय राऊतांचा शरद पवारांना लगबगीने खुर्ची देतानाचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर भाजपकडून त्यांना ट्रोल करण्यात आले होते. यावर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर राऊत संतापले होते. आणि आपल्या भावना व्यक्त करताना, माध्यमांसमोर वापरलेल्या अपशब्दांमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे.
भाजपच्या महिला मोर्चाच्या दीप्ती रावत यांनी, राउत यांनी महिलांचा अपमान केल्याप्रकरणी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून दिल्लीच्या मंडावली पोलीस स्थानकात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर कलम ५०० आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी ताबडतोब समस्त महिला वर्गाची माफी मागावी, अशी मागणी तक्रारदार दीप्ती रावत यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांना बसण्यासाठी घाईने खुर्ची देण्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संतापून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना अपशब्दाचा वापर केला होता. त्यावरूनच दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली आहे. या करण्यात आलेल्या कारवाई विषयी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी जो शब्द वापरला आहे, त्याचा अर्थ मूर्ख असा होतो. देशातील सर्व शब्दकोशांमध्ये त्याचा अर्थ तसाच दिलेला असून, अशा शब्दकोशांना सरकारची मान्यता देखील आहे.
अनेक मोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपले मत व्यक्त केले आहे. मात्र आता यावरुन माझ्याविरुद्ध दिल्लीमध्ये तक्रार दाखल करण्यात आले. नुसती तक्रार नाही, तर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र सूडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे कृत्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी सरळ माणूस असल्याने सीबीआय, ईडी यांच्यामार्फत माझ्यापर्यंत अद्याप पोहोचता आलेले नाही. हे केवळ बदल्याच्या भावनेतून मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी दिल्लीमध्ये ही तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.