लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर एमआयडीसीत आजपासून लायन्सच्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ गोवा शिपयार्डचे संचालक अॅड. दीपक पटवर्धन आणि प्रांतपाल भोजराज नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सेंटरमध्ये तीन मशीन असून महिन्याला १८० रुग्णांना डायलिसिसची सुविधा मिळणार आहे. १० मार्चपासून सेंटर रुग्णसेवेत रूजू होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लायन्स चॅरिटेबल ट्रस्टने आरोग्यक्षेत्रामध्ये डायलिसिस सेंटरचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. महिन्याला रत्नागिरीमध्ये एक हजाराहून अधिक रुग्णांना डायलिसिस घ्यावे लागते. पुढील वर्षापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ रुग्णांना मिळण्याकरिता डायलिसिससाठी आणखी ८ मशीन उपलब्ध करण्याचा मानस पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. गोवा शिपयार्डच्या सीएसआर फंडातून संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी दोन मशीन दिली आहेत.
तसेच बांधकाम व्यावसायिक सुरेश गुंदेचा यांच्यामार्फत एक मशीन मिळाले आहे. डायलिसिस सुविधेसह अतिदक्षता विभाग वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत. उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ डॉ. रमेश चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ. शैलेंद्र भोळे, सचिव पराग पानवलकर, सहसचिव आणि प्रकल्पाचे अध्यक्ष ओंकार फडके, लायन्स क्लबच्या अध्यक्षा शिल्पा पानवलकर, विभागीय अध्यक्ष श्रेया केळकर, अप्पा देसाई आणि लायन्सचे सदस्य उपस्थित होते.
किडनीचे रुग्ण वाढताहेत – मधुमेह, वेदनाशामक औषधांमुळे किडनी विकार मधुमेही रुग्ण आणि वेदनाशामक औषधांच्या अतिरेकी वापरामुळे किडनी विकाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यांना डायलिसिस करणे किंवा किडनी प्रत्यारोपण करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. किडनी प्रत्यारोपण सर्वांना शक्य नसल्याने हिमोडायलिसिस रक्तशुद्धीकरण करणे हाच पर्याय राहतो. या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लायन्सने या सेंटरची सुरुवात केली आहे.