मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दिवसागणिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रतिमहिना या गाड्यांमधून ३० ते ३५ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे गाड्यांची उपलब्धता नसल्याने प्रचंड हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य, कोकण रेल्वे तसेच रेल्वे बोर्डाने याबाबत सकारात्मक विचार करत उत्तम प्रतिसादात चालणाऱ्या मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनच्या डब्यात वाढ करावी, अशी मागणी विविध प्रवासी संघटनांची मध्य, कोकण रेल्वे, बोर्डाकडे केली आहे.
एका महिन्यावर गणेशोत्सव आला असताना गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना काही वेळातच गाड्यांचे आरक्षण फुल्ल या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आणखी विशेष गाड्या सोडण्याची मागणी प्रवासी करत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा गाडीला सध्या ८ डबे आहेत. डब्यांची संख्या वाढवल्यास आसन क्षमता वाढेल आणि प्रवाशांना अधिक क्षमतेने प्रवास करता येईल, असे विविध प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.