मिरजोळे- एमआयडीसी येथे गोवंश हत्या प्रकरणी अटक केलेल्या संशयिताकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. संशयिताने गोवंश अवशेषांची कशी विल्हेवाट लावली आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी न्यायालयाने संशयिताच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवस वाढ केली. शादाब गनी बलबले (वय ३०, रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ४ जुलैला रात्री एमआयडीसी मिरजोळे येथील रस्त्यावर घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर अज्ञात वाहनातून गोमासाचे अवशेष पडलेले निदर्शनास आले होते. या प्रकारानंतर नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले. त्यांनी ग्रामीण पोलिसात धाव घेतली.
दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी संशयितास अटक केली. न्यायालयाने संशयित बलबले याला पोलिस कोठडी सुनावली होती. आपण गुन्हा केला नसल्याचे संशयिताने म्हणणे आहे. त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या वडिलांचा मागील ३० ते ३५ वर्षाचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांच्याकडे गायी, म्हशी पाळलेल्या आहेत. तसेच गनी बलबले यांचा गायी, म्हशी विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगत आहे. पुढे पोलिसांच्या तपासात पोलिसांनी संशयिताच्या वेतोशी येथे जनावरांच्या गोठ्यात छापा टाकला. त्या ठिकाणी एक गाय, १ म्हैस व आठ बैल असे बांधून ठेवल्याचे दिसून आले.