भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या सुपर-४ सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असेल, पण या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अनेक मोठे विक्रम केले. आशिया चषकाच्या सुपर-४ सामन्यात अत्यंत रोमांचक संघर्षानंतर पाकिस्तानने टीम इंडियाचा ५ गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १८१ धावा केल्या. विराट कोहलीने ६० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १९.५ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्याच षटकापासून पाकिस्तानी गोलंदाजांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि चौकार आणि षटकारांची जोरदार फटकेबाजी केली. पॉवर प्लेमध्ये रोहित आणि राहुलमध्ये ५४ धावांची भागीदारी झाली. राहुलला साथ देण्यासाठी कोहली आला आणि या षटकात आठ धावा झाल्या. पॉवर प्लेमध्ये भारतीय संघाने १ गडी गमावून ६२ धावा केल्या होत्या.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पॉवर प्ले दरम्यान भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वीचा विक्रम ६ षटकात १ गडी गमावून ४८ धावांचा होता, जो २०१२ मध्ये बनला होता. विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर रविवारी पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ७ गडी गमावून १८१ धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. सर्वोच्च धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर २०१२ मध्ये भारताने १९२ धावा केल्या होत्या.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने रविवारी पाकिस्तानविरुद्ध १२ धावा केल्यामुळे पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. रोहितने १६ चेंडूत २८ धावा केल्या. यासह त्याने १३५ टी-२० सामन्यांमध्ये ३५४८ धावा केल्या आहेत.

