उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्याइतके बहुमत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे असूनही भाजपची झोप उडाल्याचे दिसत आहे. भाजपचे नेते विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना फोन करून आपल्या उमेदवाराला पाठींबा देण्याची विनंती करत आहेत. याचाच अर्थ त्यांच्याकडे बहुमत असूनही त्यांना विजयाची खात्री नसावी, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. इंडिया आघाडीने आखलेल्या रणनितीमुळे भाजपची झोप उडाल्याचे स्पष्ट दिसते आहे. कारण तामिळनाडूच्या राधाकृष्णन यांच्याविरोधात इंडिया आघाडीने दक्षिण भारतातीलच उमेदवार रिंगणात उतरविला आहे. काही वर्षांपूर्वी प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या तेव्हा महाराष्ट्रात मराठी माणूस या भूमिकेतून त्यांना जसे पाठबळ मिळाले, तसेच वातावरण तामिळनाडूसह आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसते आहे. हे वातावरण पाहून भाजपची झोप उडाल्याचे दिसते आहे.
इंडिया आघाडीची रणनिती – उपराष्ट्रपती पदासाठी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. इंडिया आघाडीने आंध्रप्रदेशच्या रेड्डींना उमेदवारी देत अवघ्या दक्षिण भारतातील पक्षांना धर्मसंकटात टाकले आहे. विशेषतः भाजपचे मित्रपक्ष असलेल्या आंध्रप्रदेशमधील तेलगु देसम पक्षाची यामुळे कोंडी झाली आहे. त्याचप्रमाणे तेलंगणातही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा एनडीएच्या विरोधात जाऊ शकतो, असे वातावरण आहे. त्यामुळेच ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला मोठा आटापिटा करावा लागत असल्याचे दिसते, असे शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रतिभा पाटीलांचे उदाहरण – खा. संजय राऊत यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या प्रतिभाताई पाटील यांना तत्कालीन सत्ताधारी आघाडीने म्हणजेच – काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी – आघाडीने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राची लेक देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार असल्याने काँग्रेसच्या विरोधात असलेल्या शिवसेनेनेदेखील प्रतिभाताई पाटील यांना पाठींबा दिला. शिवसेना भाजपची तेव्हा युती होती. जेष्ठ नेते आणि तत्कालीन उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत हे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. भाजपसोबत असलेली युती पाहता शिवसेनेने शेखावत यांना मतदान करणे अपेक्षित होते. मात्र मराठीच्या मुद्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई पाटील यांना जाहीर पाठींबा दिला.
तेच वातावरण पुन्हा – असेच वातावरण आत्ताच्या निवडणुकीतही दिसते आहे. उपराष्ट्रपती पदासाठी सुदर्शन रेड्डी या आंध्र प्रदेशच्या सुपुत्राला उमेदवारी देण्यात आली आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा या दोन राज्यांमध्ये तेलुगु अस्मितेच्या मुद्यावर रेड्डी यांना पाठींबा मिळताना दिसतो आहे.. एनडीएसोबत असलेल्या तेलगु देसम आणि पवनकुमार यांच्या पक्षाचे मतही तेलुगु अस्मितेसोबत असेल, असे संकेत मिळत आहेत. म्हणूनच भाजपची झोप उडाली असून त्यांनी त्यांच्याकडे. बहुमताचा आकडा असतानाही विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोनवरून आवाहन करण्यास सुरूवात केली आहे, असे खा. संजय राऊत म्हणाले.
उध्दव ठाकरेंना फोन – याच पार्श्वभूमीवरच देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत ‘एनडीए’च्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांना देखील फोन करण्यात आला आहे.
भाजपवर हल्लाबोल – या फोनवरूनच खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्याकडे पूर्ण पाठिंबा असताना तुम्ही मते का मागताय? तुम्हाला तुमची मते फुटतील याची भीती वाटते का? असे सवाल करत राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. शिवाय त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा दिल्याचंही स्पष्ट केलं.
त्याच पक्षाकडे मते मागता ? – माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही हुकूमशाही विरोधात लढण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. पण मला आश्चर्य वाटते की, बाळासाहेब ठाकरेंचा, शरद पवारांचा पक्ष तुम्ही संविधानाच्या विरोधात फोडला आणि आता देवेंद्र फडणवीस त्याच पक्षाकडे मतं मागत आहेत. ते फक्त आमच्याकडे नाही तर देशभरात मते मागत आहेत.
अधिकार आहे का? – तुमच्याकडे पूर्ण बहुमत आहे तर तुम्ही आमचा पाठिंबा का मागताय ? तुम्हाला आमच्याकडे मते मागण्याचा अधिकार आहे का? भाजपला डुप्लिकेट शिवसेनेचीही मते फुटतील असं वाटतंय का? कारण वातावरण तसं असून उपराष्ट्रपती पदाची निवडणूक इतकी सोपी नाही. मोदींकडे केवळ कागदावर बहुमत आहे, असं राऊत म्हणाले.