रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागामध्ये जिथे जंगलमय परिसर अधिक प्रमाणात आहे, तिथे मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा मोकळा वावर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी जंगले रस्त्यांच्या रुंदीकरण किंवा इतर डागडुजीच्या कामासाठी जंगले तोडण्यात आली आहेत. वन्य प्राण्यांचा निवाराच नष्ट करण्यात आल्याने जंगली प्राणी भर वस्तीत येऊ लागली आहेत.
गावांमध्ये असणाऱ्या पाळीव प्राण्यांसह मानवी जीवाला सुद्धा त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. सध्या आंब्याचा मोसमाला सुरुवात झाल्याने त्याचप्रमाणे शेतीची नासधूस करण्यासाठी देखील गवे, वानर सारखे प्राणी वस्तीत घुसून उच्छाद मांडू लागली आहेत.
जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील आंबवली मराठवाडी वरचीवाडी येथील जयराम राजाराम सावंत यांच्या मालकीच्या विहिरीत गवारेडा पडल्याची माहिती आंबवलीच्या सरपंचांनी वनविभागाला दिली. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
सावंत यांच्या विहिरीला कठडा बांधलेला नसल्याने व विहिरीवर ग्रीनशेड नेट असल्याने रानगव्याला अंदाज आला नाही. तो थेट विहिरीत पडला असावा असे मत वनपाल तौफिक मुल्ला यांनी व्यक्त केले. गवारेडा विहिरीत पडल्याचे कळताच ग्रामस्थ व वनविभाग कर्मचारी यांनी कुदळ, टीकाव, फावडे यांच्या मदतीने खोदकाम करुन गवारेड्यास बाहेर पडण्यास नवा मार्ग तयार करून दिला. जेणेकरून त्याला सुखरुप विहिर बाहेर पडण्यास मार्ग मोकळा होईल. नर जातीचा हा गवारेडा सुमारे ४ वर्षाचा होता. त्याला वाट करून दिल्यानंतर हा गवारेडा जंगलाच्या दिशेने पळून गेला. विहिरीच्या भोवती झालेली गर्दी पाहून तो बिथरून गेला होते, मार्ग मिळताच त्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
यावेळी ग्रामस्थांसह विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका लगड, वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक रा.भा.गुंठे, श.म.रणधीर यांसह कर्मचारी उपस्थित होते.