गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाची आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकातील विजयी मालिका सोमवारी कायम राहिली. सलामीच्या लढतीत चीनवर विजय मिळवल्यानंतर भारतीय हॉकी संघाने जपानचा ५-१ असा धुव्वा उडवला. सुखजीत सिंगने दोन गोल केले, तर अभिषेक नैन, संजय राणा व उत्तम सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. आता ११ सप्टेंबर रोजी होणार असलेल्या लढतीत भारतीय हॉकी संघासमोर मलेशियाचे आव्हान असणार आहे. या स्पर्धेचे चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाने सलामीच्या लढतीत चीनला पराभूत करताना उल्लेखनीय खेळ केला.
जपानविरुद्धच्या लढतीतही याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. दुसऱ्याच मिनिटाला सुखजीत सिंग याने अप्रतिम फिल्ड गोल केला. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला अभिषेक नैन याने स्वबळावर सुंदर गोल केला. जपानच्या बचावपटूंना चकवत त्याने जपानी गोलरक्षकाचा बचाव भेदला. भारताने २-० अशी आघाडी घेतली. भारतीय हॉकी संघाचा झंझावाती आणि आक्रमक खेळ दुसऱ्या क्वॉर्टरमध्येही कायम राहिला. संजय राणा याने १७व्या मिनिटाला भारतासाठी तिसरा गोल केला. संजय याने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल केला.
अखेरच्या क्वॉर्टरमध्ये दोन गोल – जपानकडून ४१ व्या मिनिटाला एकमेव गोल करण्यात आला. काझुमासा मातसुमोतो याने हा गोल केला व कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या क्वॉर्टरमध्ये भारताकडून दोन गोल करण्यात आले आणि जपानच्या विजयाच्या आशांना सुरुंग लागला. उत्तम सिंगने ५४ व्या मिनिटाला आणि सुखजित सिंगने ६० व्या मिनिटाला गोल करीत भारताच्या महाविजयावर शिक्कामोर्तब केले.