सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने मागील टी-२० मालिकांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. आता घरच्या मैदानावर होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही पहिल्या दोन लढतींत विजय मिळवून धडाकेबाज सुरुवातही केली, मात्र तिसऱ्या टी-२० लढतीत पाहुण्या इंग्लंडने विजयाला गवसणी घालून पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम राखले. आता पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर दोन देशांमध्ये चौथा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. याप्रसंगी टीम इंडियाचे लक्ष्य या लढतीत विजय मिळवून टी-२० मालिका खिशात घालण्याकडे असेल. पाहुणा जॉस बटलरचा इंग्लंडचा संघ २-२ अशी बरोबरी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. पहिल्या दोन सामन्यात जबरदस्त अन् वरचढ खेळ करून दोन विजयांसह मालिकेत आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला राजकोट टी-२० सामना जिंकून इंग्लंडने रोखले. पाच सामन्यांची मालिका जिवंत राहिल्याने पुणे टी-२० सामन्याचे महत्त्व वाढले आहे.
राजकोटला केलेल्या चुका टाळून सुधारित खेळ करण्याच्या उद्देशाने भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर उतरणार आहे. राजकोट सामन्याअगोदर खेळपट्टी अगदी ‘पाटा’ म्हणजेच पूर्णपणे फलंदाजीला पोषक असल्याचा अंदाज सगळ्या जाणकारांनी वर्तवला होता, पण झाले भलतेच. राजकोटच्या खेळपट्टीने गोलंदाजांना सामन्यात आपले कौशल्य दाखवायची संधी दिली. परिणामी दोन्ही बाजूच्या प्रमुख फलंदाजांना जम बसवताना आणि फटकेबाजी करताना आव्हान निर्माण झाले. गहुंजे मैदानावरची खेळपट्टीही टी-२० क्रिकेटला साजेशी म्हणजेच फलंदाजीला पोषक बनवण्याचा घाट घातला गेला आहे. प्रत्यक्षात खेळपट्टी काय रंग दाखवते, हे सामना चालू झाल्यावरच समजणार आहे.
वरुण, अदिलची प्रभावी गोलंदाजी – फलंदाज अडखळत असताना दोन्ही संघाच्या खासकरून फिरकी गोलंदाजांनी भेदक मारा केला आहे. वरुण चक्रवर्तीच्या वेगळ्या शैलीच्या माऱ्याचा अंदाज इंग्लिश फलंदाजांना अजिबात आलेला नाही. तसेच अदिल रशीदने कधी लेग स्पीन, तर कधी गुगली टाकून भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले आहे. खूप दिवसांनी सामना खेळत असून, मोहम्मद शमीने चांगली लय गोलंदाजी करताना दाखवली आहे, जी भारतीय संघासाठी जमेची बाजू मानावी लागेल.
तिकीटविक्रीला जोरदार प्रतिसाद – कामाचा वार असून, सामन्याची वेळ संध्याकाळची असल्याने तिकीटविक्रीला जोरदार प्रतिसाद लाभला आहे, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त करत सांगितले आहे. पुण्यात सध्या विविध संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने त्याबाबतही काही काळजी घेतली जात आहे, असे समजले.