शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वेदांता फॉक्सकॉननंतर सी-२९५ लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्यप्रमाणे उद्योजकांनाही आता या सरकारवर विश्वास राहिला नसून, महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, चौथा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला आहे. या धीम्या सरकारमधील एक इंजन फेल झालं आहे. तर जनतेप्रमाणे उद्योजकांनाही या सरकारवर विश्वास राहिला नाही. महिनाभरापूर्वी सांगितलेला प्रकल्प महाराष्ट्रात येणार असताना, मग तो गेलाच कसा? असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
उदयोगमंत्री उदय सामंत यांनी देखील प्रत्युत्तरादाखल पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं आहे. एअरबस आणि वेंदाता प्रकल्पाबाबत काही कागदपत्र त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी दोन्ही प्रकल्प महाराष्ट्रातच राहावेत, यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोपही केला. सरकार गेल्यानंतर राग असू शकतो. पण राग किती काढायचा? यालाही बंधने आहेत. आदित्य ठाकरे यांना सरकार गेल्याचा राग आहे, असेही यावेळी सामंत यांनी सांगितलं.
सरकार घटनाबाह्य आहे, कृषीमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, उद्योगमंत्र्यांनी राजीमाना दिला पाहिजे असे आरोप करत आदित्य ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेलाच विरोध केला आहे. राजीमाना मागण्यापर्यंतचे राजकीय आरोप मी समजू शकतो. पण आदित्य ठाकरे फक्त बोलत आहेत, त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांनी कागदपत्र द्यावीत, असे उदय सामंत म्हणाले.
एअरबसच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारची टाटासोबत झालेल्या बैठकीतील पुरावे महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करावेत, अशी विनंती केली होती. माझ्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेला काही कागदपत्र देतील असं वाटलं होतं.