जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर भात लागवड वेळेत पूर्ण झाली; मात्र श्रावण सुरू झाल्यानंतर पावसाने उघडीप घेतल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. कडकडीत उन्हामुळे संगमेश्वर तालुक्यात धामणी, राजवाडी, गोळवलीसह काही भागात सुमारे दोन हेक्टर भातशेतीवर निळे भुंगेरे व करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे तर राजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये करपा रोग दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली असून, पावसाने अशीच दडी मारल्यास त्याचा फटका भात उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सर्वत्रच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे कमी-अधिक प्रमाणात निळे भुंगेरे आणि करपा दिसत आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी आणि असमान पाऊस झाला. दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचा जोर राहिल्यामुळे भात रोपवाटिकांना विलंब झाला होता. पुढे जुलै महिन्यात पावसाने जोर केल्यामुळे भात पुनर्लागवडीत कोणतीच अडचण आलेली नाही; मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप घेतली. आज (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ४ मिमी पाऊस झाला आहे तसेच १ जूनपासून आतापर्यंत सरासरी २७९१.६८ मिमी पाऊस झाला असून, तुलनेत ७७ टक्केहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे भातशेती तरारली आहे; मात्र ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने उघडीप दिली.
गेले चार दिवस कडकडीत ऊन पडल्यामुळे संगमेश्वर, राजापूर तालुक्यात भातशेतीवर करपा रोगासह निळ्या भुंगेरा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. संगमेश्वर तालुक्यात धामणी, गोळवली, राजवाडी, वाशीतर्फे संगमेश्वर, कुळ्ये या गावात शेतीवर करपा आढळलेला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतांमधील भाताची रोपे किडींनी फस्त केली आहेत. काही ठिकाणी रोपं उन्हामुळे पिवळी पडली आहेत. पावसाची स्थिती अशीच राहिली तर भात उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कृषी विभागाकडून तातडीने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली आहे. निळ्या भुंगेऱ्यांचा अधिक प्रादुर्भाव आहे तर करपा किरकोळ ठिकाणी आहे. त्यावर अधिकाऱ्यांनी उपाययोजना सुचवलेल्या आहेत. दरम्यान, यंदा जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड झालेली आहे. समाधानकारक पावसामुळे रोपवाढीला जोर मिळाला आहे; परंतु उन्हामुळे बळीराजावर संकट निर्माण झालेले आहे. कातळावरील भातशेतीला मोठा फटका बसू शकतो, असे शेतकऱ्यांचे मत आहे.