जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेला ४ आधुनिक बस दाखल झाल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री आणि योजनेचे प्रमुख दीपक केसरकर यांनी या गाड्यांची नुकतीच पाहणी केली. बचतगटांच्या – प्रभागसंघांच्या माध्यमातून या बसेस चालवण्याचा या पथदर्शी प्रकल्पामुळे महिलांचे सक्षमीकरण होणार आहे. कोकणात पर्यटनाला प्रचंड वाव असलेल्या येथे पर्यटन रूजविण्यासासाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. त्यापैकी हा एक पथदर्शी प्रकल्प रत्नागिरीत होणार आहे.
सिंधुरत्न समृद्ध योजनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास विभागाला या आलिशान बस दिल्या जाणार आहेत. एक बस साधारण २८ लाखांच्या दरम्यान आहे. चार बससाठी १ कोटी २३ लाख रुपये मंजूर आहेत. या चारही बसेस वेगळ्या आणि आलिशान ढाच्यामध्ये बांधण्यात आल्या आहेत. सतराआसनी या गाड्या आहेत. एसी, चार्जिंग पॉईंटसह करमणुकीची साधने त्यामध्ये आहेत. रत्नागिरी, संगमेश्वर दर्शनासह अन्य ठिकाणी या बसेस जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा ठेवण्यात येणार आहे.
महिला बचतगटांच्या प्रभाग संघांच्या माध्यमातून त्या चालविल्या जाणार आहेत. रत्नागिरी तालुक्याला २, संगमेश्वर १ आणि दापोली तालुक्याला १ बस दिली जाणार आहे. १५ ऑगस्टला पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या आलिशान टुरिस्ट बसचे उद्घाटन होणार असल्याचे या विभागाने सांगितले.