लोकसेवांची सूची असलेले क्युआर कोड सार्वजनिक ठिकाणी लावा, असे शासनाचे आदेश आहेत. ते क्युआर कोड स्कॅन करताच शासकीय सेवा, त्यासाठी लागणारे शुल्क व काम पूर्ण होण्याची मुदत आदी माहिती नागरिकांना सहज समजत आहे, तसेच तक्रारी करण्याचीही सुविधा आहे. लोकसेवा हक्काचा कायदा २०१५ मध्ये तयार झाला आहे. त्यात अनेक तरतुदी आहेत; मात्र त्याबाबत शासकीय कार्यालयीन स्तरावर उदासीनता असल्यामुळे या कायद्यानुसार नागरिकांना सेवांची माहिती मिळत नव्हती. केवळ कार्यालयांमध्ये हे फलक लावण्यात आले असून, अन्य भागांत जनजागृतीकडे सर्वच कार्यालयांनी दुर्लक्ष केले होते.
हे शासनाच्या लक्षात आल्यामुळे आता प्रत्येक कार्यालयाच्या सेवांचा क्युआर कोड तयार करण्यात आला आहे. तो सेवा हक्कदिनाच्या पार्श्वभूमीवर लावण्याचे आदेश शासनाने सर्व कार्यालयांना दिले होते. त्यानुसार येथील प्रांत, तहसील, नगरपालिकेने आपल्या सेवांचे क्युआर कोड कार्यालयांबाहेर लावले आहेत. हे क्युआर कोड स्कॅन करताच कार्यालयांमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यासाठी लागणारे शुल्क व ते काम किती दिवसात होईल, याची संपूर्ण माहिती मिळत आहे. एवढेच नव्हे, तर त्या कार्यालयाची तक्रार करण्यासाठी दुसरा क्युआर कोड लावण्यात आला आहे. त्यामुळे तक्रार करणेही सोपे झाले आहे.
शहरभर लावणार फलक – नगरपालिकेच्या माध्यमातून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, विवाहनोंदणी, नव्याने कर आकारणी, करमाफी मिळणे, थकबाकी नसल्याचा दाखला, वारसाहक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, आक्षेप नोंदवणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, बांधकाम परवाना देणे, भोगवटा प्रमाणपत्र देणे, नळजोडणी देणे, प्लंबर परवाना, मंडपासाठी नाहरकत दाखला, फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे आदी ६५ प्रकारच्या सेवा दिल्या जातात. त्याचा क्युआर कोड सध्या नगर पालिका परिसरात लावण्यात आला आहे तसेच शहरातील विविध भागात लावण्याची प्रक्रिया मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर आदींनी सुरू केली आहे.